बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन विरोधात प्रांत कार्यालया समोर साखळी आंदोलन
 पंचनामे होऊन देखील दंडात्मक कारवाई होत नाही


राजगुरूनगर (टाईम न्युजलाईन नेटवर्क): खेड तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने गुरुवारपासून (दि.१९) राजगुरुनगर येथील प्रांत कार्यलयासमोर विविध प्रश्नांबाबत धरणे साखळी आंदोलन करण्यात आले आहे. खेड तालुक्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन सुरू आहे. त्यातील काही ठिकाणचे पंचनामे होऊन देखील दंडात्मक कारवाई होत नाही. खेड घाट बाह्यवळण येथे संगनमताने कामे सुरू  आहेत. त्यात महसुल विभागाची कारवाई संशयास्पद आहे. त्यामुळे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने आंदोलन छेडले आहे, असे अ. भा. ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष देवानंद बवले यांनी सांगितले.

 

चाकण महसूल मंडळात ७/१२ नोंदनी व फेरफार प्रलंबित असणे. माहिती अधिकार पत्र व इतर निवेदनांना वेळेत लेखी उत्तर न देणे. महा-ई-सेवा केंद्रातील सुविधा प्रमुखांकडून आर्थिक पिळवणूक होणे. ७/१२ दुरूस्ती तील ‌१५५ कलम आदेश तत्काळ ‌ निर्देशीत करून कारवाई न करणे. कोविड १९ काळात रेशनिंग दुकानदारांना केंद्र सरकारच्या नियमावली प्रमाणे ‌धान्य वाटप निर्देश न देणे. राजगुरूनगर नागरपरिषदेच्या कामकाजाची सखोल चौकशी करणे आदी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.


आंदोलनादरम्यान उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी या मुद्द्यांवर आंदोलकांशी चर्चा केली. मात्र काही ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.


उपोषणस्थळी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, मराठा क्रांती मोर्चा प्रदेश समन्वयक मनोहर वाडेकर, नगरसेवक शंकर राक्षे, खेड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. अनिल राक्षे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे, हुतात्मा राजगुरु सोशल फौंडेशनचे अध्यक्ष ऍड. सुनील वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य रेवणनाथ थिगळे, समर्थ फौंडेशनचे संस्थापक ऍड. विजयसिंह शिंदे पाटील यांनी भेट दिली. 


तसेच आंदोलनाला राष्ट्रीय छावा संघटना, मराठी स्वराज्य संघ, भ्रष्टाचार अपराध मुक्त न्याय दल,

 विश्व हिंदू परिषद, अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती,

लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर या संघटनांनी पाठिंबा दिला आहे असे संघटक अमितकुमार टाकळकर यांनी सांगितले.आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, जिल्हा महिला संघटिका वैशाली अडसरे, कोषाध्यक्ष अवधूत प्रसादे, सहसंघटक विठ्ठल दौंडकर, बबन गावडे, धनंजय देव्हरकर, अक्षता कान्हूरकर, उज्वला शेटे, सविता मायदेव, कल्पेश जैन, शंकर तांबे आदींनी सक्रिय सहभाग घेतला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget