October 2020

 

-भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

-आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप यांचा पक्षातर्फे गौरव


पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क)

भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी आपलं राजकीय स्थान एवढं भक्कम करून ठेवलं आहे, की त्यांना हरवणं आता कोणालाही शक्य नाही. राजकीय आयुष्यात अनेक चढ-उतार त्यांनी पाहिले आहेत. त्यामुळे ‘हरणं मला माहीत नाही’, हा आत्मविश्वास त्यांच्या अंगी ठासून भरलेला आहे. आगामी राजकीय जीवनात कितीही कठोर अडथळे आले तरी त्यावर मात करून पुढे जाण्याची त्यांची भूमिका इतरांना आदर्श घालून देणारी ठरेल, अशा शब्दांत राज्याचे माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार महेश लांडगे यांच्या यशस्वी राजकीय वाटचालीचे कौतुक केले.

चालू पंचवार्षिकच्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विजयाला आज (दि. २४ ऑक्टोबर ) एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आमदार लांडगे आणि आमदार जगताप यांचा पिंपळे सौदागर येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री रवि अनासपुरे, महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, प्रदेश सचिव अमित गोरखे, प्राधिकरण माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, प्रदेश सदस्य एकनाथ पवार, प्रदेश सदस्य राजेश पिल्ले, महिला अध्यक्षा उज्वला गावडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व समित्यांचे सभापती, सर्व प्रभाग समित्यांचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व मंडलाध्यक्ष, पक्षाचे प्रदेशाचे व जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी केले. तर सरचिटणीस विजय फुगे यांनी आभार मानले.

तळागाळातील कार्यकर्त्यांमुळेच राजकीय यश : आमदार लांडगे

आमदार लांडगे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची सुरूवातच मुळात 'भारत माता की जय' या घोषवाक्याने होते. देशाप्रती असलेलं प्रेम आणि समाजाप्रती असलेली वैचारिक बांधिलकी जपण्याचे प्रमाणिक कार्य भाजपात होते. त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीसोबत एका वैचारिक प्रवाहात असल्याचे समाधान वाटते. मला इथपर्यंत पोहोचविण्यात माझ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. 2014 नंतर भोसरीतल्या नगरसेवकांनी केलेल्या कामामुळेच 2019 च्या निवडणुकीत माझं मताधिक्य वाढलं. हे योगदान भोसरीतल्या भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे आणि कार्यकर्त्यांचे आहे. त्यांच्यामुळेच मी समाजकार्यासाठी स्वतःला वाहून दिले आहे. याची जाणिव मला माझे वडिल वारंवार करून देतात. मी केवळ लांडगे परिवारातला नसून समाज हाच माझा परिवार असल्याची आठवण मला वडिल करून देतात. हीच भावना मनाशी बाळगून मी 24 घंटे समाजाप्रती बांधिलकी जपण्याचे काम करत असतो, अशी भावना आमदार लांडगे यांनी व्यक्त केली.
****
कार्यकर्त्यांमुळेच चार निवडणुका जिंकलो: आमदार जगताप

आमदार जगताप म्हणाले की, हा सत्कार आमचा नसून आमच्या यशात मोलाचे योगदान देणा-या भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांचा आहे. त्यांच्यामुळेच माझी राजकीय वाटचाल गेली 35 वर्षे यशाच्या शिखरावर अभिमानाने डोलत राहिली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच आमदारकीच्या चार निवडणुका जिंकलो. दरम्यान, एक लोकसभेची निवडणुक हरलो. आता निवडणूक हरण्याचा अनुभवही घेतला आहे. त्यामुळे हरण्याचे भय मनातून कायमचे दूर झाले आहे. भारतीय जनता पार्टीने मला साथ दिल्यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता राजकीय क्षेत्रात जिवंत राहू शकला. पत्नी, भाऊ आणि कुटुंबातील सर्व सद्स्य खंबीरपणे पाठिशी उभे राहिले. म्हणूनच आज मी या व्यासपीठावर उपस्थित आहे. कार्यकर्त्यांनी वेळेचं नियोजन करून लोकांना जोडण्याचे काम करावे, असा सल्लाही जगताप यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दिला.

 


वडगाव मावळ (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाही.वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे.त्यातीलच एक महिला
रानावनात फिरून वनांचे रक्षण करणे,वन्य जीवांची शिकार थांबविणे,वृक्षलागवडचा संदेश देणें,नागरिकांना वन्य प्राणी व वृक्ष लागवडी व संरक्षणासाठी जनजागृती करण्याचे काम मावळ मधील  नियत क्षेत्र वन अधिकारी ऐश्वर्या वाघमारे करीत आहे.त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्याचा पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांनी कामात झोकून दिले आहे.
मावळ तालुक्यात वन विभागात ऐश्वर्या वाघमारे या नियत क्षेत्र वन अधिकारी बेबड ओहळ (रेंज वडगाव) य पदावर कार्यरत आहेत.मावळात असलेली वन विभागात वाघमारे या महिला असूनही निर्भीडपणे कर्तव्य बजावत आहेत.त्या स्वतः निसर्ग प्रेमी असल्यामुळे त्या आपल्या विभागाच्या कार्यात झोकून देत आहे.वन परीक्षेत्र  अधिकारी सोमनाथ ताकवणे यांच्या मार्गदर्शनमुळे त्यांनी दिवड ओवळे परिसरात वन्य जीवाची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.तर पवन मावळ परिसरात झाडे लावा झाडे जगवा हा संदेश नागरिकांमध्ये रुजवला आहे.
वाघमारे या वन रक्षण करण्यासाठी गावगावात समित्या स्थापन करून वनांचे रक्षण कसे करायचे या बाबत जनजागृती करीत आहे.वृक्षारोपण करण्यासाठी त्या गावातील ग्रामस्थांना प्रोसाहित करत आहेत. तर वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांची चौकशी करून वरिष्ठाच्या आदेशानुसार शिकऱ्यांवर कारवाई केली .शिकाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे वन्य प्राण्यांच्या शिकारी थांबल्या आहे. वनक्षेत्रातील मोठ्याप्रमाणात असणारी गुन्हेगारी जनजागृती करून थांबविली.त्यामुळे वनक्षेत्रात वन्य प्राण्याचा वावर मुक्तपणे होत असल्याचे दिसून येत आहे.
ऐश्वर्या वाघमारे या निसर्ग प्रेमी असल्यामुळे त्या काम प्रामाणिकपणे करीत आहे. ग्रामीण भागात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

 


नंदूरबार (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळल्याने घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील वर्तवली जात आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या भीषण अपघातमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 



पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने संघटनेचा विस्तार करण्यासाठी अनेक नियुक्त्या केल्या आहे.भाजपच्या शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी किसन बावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे चिखली तळवडे परिसरात भाजपची ताकद वाढणार आहे.
भाजपचे शहर अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील संघटन मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहे. महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी संघटनेची रचना केली आहे.शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी चिखलीचे भाजपचे कार्यकर्ते किसन बावकर यांची नियुक्ती केली.यामुळे चिखली तळवडे परिसरात भाजपची ताकद वाढणार आहे.बावकर हे पिंपरी चिंचवड माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.
या संदर्भात किसन बावकर म्हणाले की,भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्णपणे पार पडणार आहे.शहारत भाजपचे संघटन मजबुत करून शहर भाजपामय करण्याचा प्रयत्न करणार आहे.तसेच शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येवर आवाज उठविणार असून त्या कशा पद्धतीने सोडविण्यात येईल त्या संदर्भात प्रयन्त करणार आहे.असे त्यांनी सांगितले.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते "पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार"

अभियानाचा शुभारंभ

  • पुणे, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):


कोरोना विरुध्दच्या लढाईत  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वाची  ठरत आहे. पुण्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोनामुक्त करण्यासाठी "पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार" अभियान सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुक्त पुणे करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. "पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार" अभियानाला सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोरोना (कोविड-१९) विरोधात जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिमेंतर्गत पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ व सामाजिक कार्य गट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या "पुण्याचा निर्धार - कोरोना हद्दपार" या अभियानाचा शुभारंभ झाला.  यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, उपमहापौर सरस्वती शेंडगे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी  डॉ राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर,  पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादितचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यात सर्वत्र ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कुटुंबांची या आरोग्य पथकाकडून प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठीच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही तेवढेच आवश्यक आहे.  त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठीच्या प्रयत्नांना साथ द्यावी. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हातांची नियमित स्वच्छता आदी  दक्षता नियमांचे पालन करत आपल्याला कोरोनाशी मुकाबला करून अर्थव्यवस्था पुढे घेवून जावी लागणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

           पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटत आहे, ही समाधानकारक बाब असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आपल्याला अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. आपण यापूर्वीही घरी राहून, दक्षता घेत सण उत्सव साजरे केले आहेत. यापुढेही नियमांचे पालन करून सण उत्सव घरीच साजरे  करूया, तसेच कोरोनामुक्त पुणे शहर करण्याचा निर्धार करुया, असे सांगून राज्य शासन सर्वतोपरी पुणेकरांसोबत आहे, कोरोना उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोना मुक्तीसाठी सर्व यंत्रणा उपाययोजना करत आहेत, पुणे शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. यापुढेही काळजी घेत कोरोनाला हरवूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक करताना डॉ. सुभाष साळुंके म्हणाले,  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत "पुण्याचा निर्धार- कोरोना हद्दपार" अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगतानाचा कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, त्यामुळे यापुढील कालावधीतही प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी "पुण्याचा निर्धार- कोरोना हद्दपार" अभियानांतर्गत सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ अंतर्गत बसचे चालक, वाहक यांना फेसशिल्ड, मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिक,पीएमपीएमएलचे कर्मचारी उपस्थित होते. आभार पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेंद्र जगताप यांनी मानले.

शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे सहा ठिकाणी आंदोलन - कीर्तन, टाळ- मृदंगाच्या गजरात राज्य सरकारचे लक्ष वेधले पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दारु दुकाने, बार सुरू केले. मात्र, नागरिकांची श्रद्धास्थान असलेली मंदिरं अद्याप बंद ठेवली आहेत. मंदिरं बंद अन् उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार…अशी टीका भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिर बंद ठेवली आहेत. या निर्णयाविरोधात आणि आमची श्रद्धास्थाने असलेली मंदिरं ताबडतोब उघडावीत. या मागणीकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धर्माचार्य, साधु-संत, सर्व धार्मिक संस्था-संघटना एकत्र येत अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नेतृत्वात मंगळवारी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. कुदळवाडी येथील श्री दुर्गामाता मंदिरात पिंपरी-चिंचवडमधील उपोषणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताआबा गायकवाड, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका निर्मला गायकवाड, सुवर्णा बुर्डे, सचिन तापकीर, गीता महेंद्र, उदय गाकवाड, सुनील लांडे, प्रवीण काळजे, सरचिटणीस विजय फुगे, नगरसेविका प्रियांका बारसे, राजश्री जायभय, सरिता शर्मा, प्रसिद्धीप्रमुख पटनी आदी उपस्थित होते. तसेच, चिंचवड गाव येथे श्रीमान मोरया गोसावी मंदिराच्या आवारतही आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील सहा मंदिरांच्या आवारात दिवसभरात आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला शहराध्यक्ष उज्ज्वला गावडे, सरचिटणीस अमोल थोरात, विजय फुगे, नगरसेवक स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार महेश लांडगे म्हणाले की, संपूर्ण जगाला भक्तीचा आदर्श देणारा आपला पालखी सोहळा राज्य सरकारच्या सूचनेनुसार रद्द केला. प्रशासनाच्या आणि सरकारच्या निर्णयाचा प्रत्येक नागरिकाने आदर ठेवला. लॉकडाउन संपल्यानंतर पहिला निर्णय राज्य सरकारने घेतला तो दारुची दुकाने चालू केली. हॉटेल चालू झाले. बिअर बार चालू झाले. मात्र, मंदिरं उघडली, तर कोरोनाचा संसर्ग वाढेल, असा शोध राज्य सरकारने लावला आहे. त्याला भाजपाचा विरोध आहे. नवरात्रोत्सवापूर्वी राज्यातील मंदिरं खुली करावी. या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. …तर भाजपाच्या रणरागिणी मंदिरांची कुलपं तोडतील : महापौर महाविकास आघाडी सरकारने नागरिकांची श्रद्धास्थान असलेली मंदिरं बंद ठेवली आहे. आता नवरात्रोत्सव येत आहे. याकाळात महिला- भगिनींची व्रत असतात. पूजा करायची असते. मात्र, मंदिरंच बंद असल्यामुळे महिलांना नवरात्रोत्सव साजरा करता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यात आले आहेत. मग, मंदिरं बंद का ठेवली जात आहेत? असा सवाल उपस्थित करीत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सरकारवर टीका केली. तसेच, मंदिरं उघडली नाहीत, तर भाजपाचा रणरागिनी मंदिरांची कुलपं तोडून प्रवेश करतील, असा इशाराही दिला आहे.

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget