खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांचा खर्च सरकारने द्यावा; आमदार लक्ष्मण जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

पिंपरी, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): – सरकारने कोरोना महामारीच्या काळात सर्व धर्मदाय आणि खासगी रुग्णालयांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबविण्याची सक्ती न केल्याने आज परिस्थिती गंभीर बनली आहे. खासगी रुग्णालयांचा उपचार खर्च परवडत नसल्याने कोरोनाबाधित नागरिक सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जातात. तेथे रुग्णांची संख्या मोठी असल्याने अनेकांना आयसीयू बेडसाठी वाट बघावी लागते. परिणामी वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि रुग्णांच्या मृत्यू संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही परिस्थिती भयावह होण्यापूर्वीच खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचा खर्च सरकारने करावा, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. तसेच सर्व धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तातडीने लागू करण्यासाठी वारंवार पत्र पाठवूनही सरकार दरबारी दुर्लक्ष केल्याबद्दल आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे.

 

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, “पुणे व पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दुर्दैव म्हणजे कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशी परिस्थिती उद्‌भवू नये यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी या महामारीचे संकट आहे तोपर्यंत सर्व धर्मादाय आणि खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना तातडीने लागू करण्याबाबत मी स्वतः आपणाला वारंवार पत्र पाठवून सुचविले होते. खासगी रुग्णालयांमध्ये सामान्यांना कोरोनावर मोफत उपचार व आयसीयू बेड मिळावेत आणि सरकारी रुग्णालयांवर येणारा ताण कमी व्हावा, हा त्यामागचा उद्देश होता. परंतु, मी वारंवार पाठविलेल्या पत्रांकडे सरकार दरबारी दुर्लक्ष करण्यात आले, याची खंत वाटते.  

 

सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांमधील उपचार खर्च परवडत नाही. त्यामुळे हा सामान्य माणूस कोरोनाबाधित झाल्यानंतर सरकारी रुग्णालयांत दाखल होत आहे. ही संख्या खूप मोठी आहे. परंतु, सरकारी रुग्णालयात आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची कमतरता आहे. तेथे उपचारासाठी गेल्यानंतर आयसीयू बेडसाठी वाट बघावी लागते. बेड मिळत नसल्याने वेळेवर उपचार होत नाहीत आणि श्वास घेण्याचा त्रास व इतर आजार जास्त वाढत जातो. त्यातून आज आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरअभावी कोरोनाबाधितांचा मृत्यू होण्याची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. सरकारने खाजगी रूग्णालयांतील ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश काढताना रुग्णाची खर्चिक बाजूही लक्षात घेणे तितकेच महत्वाचे होते. सामान्य रुग्णाला तेथील खर्च परवडणारा आहे का? याकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

 

एकीकडे सरकार जम्बो कोविड सेंटर सुरु करून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. परंतु, शहरातील सर्व खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेले डॉक्टर्स, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर, सुविधा या सर्वांचे एकत्रीकरण केल्यास कोरोनाबाधित रुग्णांसाठी आयसीयू बेड मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. सरकारला वेगळे जम्बो कोविड सेंटर उभे करण्याची गरज भासणार नाही. उपचारासाठी खासगी रुग्णालये उपलब्ध झाल्यास सरकारी रुग्णालयांवर येणार ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच आयसीयू बेड मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू प्रमाणावर नियंत्रण आणणे शक्य होईल. जर सर्व खासगी रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येणार नसेल, तर या रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचा खर्च सरकारमार्फत करण्यात यावा. जेणेकरून कोरोनाबाधित रुग्णांवर खर्चाचा आर्थिक बोजा येणार नाही आणि वेळेत उपचार होऊन मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.”

 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget