ऑक्सिजन उत्पादकांनी 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी उपलब्ध करुन द्यावा-जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख

ऑक्सिजन उत्पादकांसोबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी घेतली बैठक


पुणे(टाईम न्यूजलाईन नेटवर्क):  सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ऑक्सिजन उत्पादकांनी एकूण उत्पादनाच्या 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी तर 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक उत्पादनासाठी उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केल्या.

  जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्सिजन उत्पादक व ऑक्सिजन सिलेंडर भरणारे उत्पादक व पुरवठादारांसोबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, अन्न, औषध, प्रशासन विभागाचे सहआयुक्त सुरेश पाटील, औषध निरीक्षक प्रमोद पाटील, सहाय्यक आयुक्त शाम प्रतापराव, उद्योग विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे, जिल्हा उद्योग केंद्राचे सरव्यवस्थापक पी.डी. रेंदाळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर आदी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, पुणे जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयांकडून ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. गंभीर रुग्णांवर उपचार करताना ऑक्सिजनची कमतरता भासू     नये, यासाठी उत्पादकांनी पुरेशा प्रमाणात व वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा करावा.
प्रत्येकाचा जीव बहुमूल्य असून प्रत्येक जीव वाचवणं महत्वाचं आहे. सध्या कोरोना परिस्थिती कठीण असली तरी ऑक्सिजन उत्पादक कंपन्या व सिलेंडर भरणाऱ्या घटकांनी लोकसेवेच्या भावनेतून  योग्य ते नियोजन करुन आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असेही जिल्हाधिकारी डॉ देशमुख यांनी सांगितले.

ऑक्सिजन सिलेंडर भरणाऱ्या उत्पादकांशी संवाद साधून डॉ.देशमुख म्हणाले, ऑक्सिजन सिलेंडर भरणाऱ्या उत्पादकांनी त्यांच्याकडे भरण्यात आलेले सिलेंडर केवळ वैद्यकीय उपचारासाठी वितरीत करावेत. रुग्णालय व ऑक्सिजन सिलेंडर भरणाऱ्या छोट्या उत्पादकांपर्यंत टँकर जलदगतीने पोहोचवण्यासाठी द्रवरुपातील ऑक्सिजन टँकरच्या वाहतूक वितरणादरम्यानच्या त्रुटी उत्पादकांनी दूर कराव्यात व पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन करावे.

यावेळी ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांचे प्रमुख, ऑक्सिजन सिलेंडर भरणारे उत्पादक व पुरवठादारांनी जाणवणाऱ्या अडचणी मांडल्या. रुग्णालयांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासनही उपस्थितांनी दिले.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget