अनैतिक संबंधातून महिलेची हत्या
देहूरोड (टाईम न्यूजलाईन नेटवर्क) : सतत होत असलेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीचे अपहरण केले देहूरोडजवळील किवळे येथे घेऊन जाऊन तिचा गळा दाबून, दगडाने ठेचून प्रेयसीची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खाणीत टाकला.
पोलिसांनी प्रशांत गायकवाड (वय 31, किवळे) विक्रम रोकडे (वय 33, रा. रहाटणी) याना अटक केली असून त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.
प्रिया शिलामन चव्हाण (वय 20, रा. आदर्शनगर, किवळे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तरीही त्याने प्रिया यांच्याशी मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवले त्यांना सहा महिन्यांची मुलगीही आहे. दरम्यान, प्रिया या देहूरोडला आदर्शनगरला माहेरी राहायच्या. मुलगी झाल्यानंतर प्रशांतने या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात सतत वाद होत. प्रिया वारंवार प्रशांतच्या किवळेतील घरी जाऊन वाद घालायची दरम्यान, शनिवारी (ता.25) पहाटे दोनच्या सुमारास प्रशांत हा प्रिया यांच्या माहेरी गेला. तेथे भांडण करीत जबरदस्तीने तेथून प्रिया यांना घेऊन गेला. प्रिया सकाळपर्यंत घरी न आल्याने त्यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून देहूरोड पोलिसांनी प्रशांत याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. प्रशांत हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अशोक जगताप यांना मिळताच त्याला रहाटणी भागातून रविवारी (ता.27) पहाटे ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 1 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर करीत आहेत