धूम्रपानविरोधी कायद्याची अंमलबजावणी कडक करावी : डॉ. यशवंत इंगळे


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : तंबाखूजन्य पदार्थ सिगारेट व गुटखा याबाबत असणा-या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी इंडियन डेंटल असोसिएशनचे (आयडीए) पिंपरी चिंचवड अध्यक्ष व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे दंतरोगविभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी केली. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त इंडियन डेंटल असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य चौकांमध्ये असोसिएशनच्या सदस्यांनी फिजिकल डिस्टनसिंगचे निकष पाळून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत फलक दाखवुन जनजागृती केली. शहरातील मुख्य चौकांत कार्यरत असणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व वाहतूक पोलीस तसेच नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत माहिती दिली.
कोरोना महामारीच्या कालावधीत केंद्र आणि राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन मुळे शहरातील तंबाखू, सिगरेट आणि तंबाखू युक्त पदार्थ विकणारी दुकाने बंद असल्यामुळे धुम्रपानाचे प्रमाण कमी झाले असे वाटत असले तरी, लॉकडाऊन संपल्यानंतर यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची भीती आहे. तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट, गुटखा यामुळे कॅन्सरसारखे जीवघेणे आजार उद्‌भवतात. याबाबत वेळोवेळी इंडियन डेंटल असोसिएशनच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. राज्यात गुटखाबंदी असली तरी अनेक छोटे, मोठे व्यावसायिक काळ्या बाजाराने गुटखा विक्री करतात. तसेच अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी कायद्याचे उल्लंघन करीत धुम्रपान करतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यसरकारने वर्षभर जनजागृतीचे उपक्रम राबवावेत. तसेच आरोग्य निरीक्षक व पोलिसांमार्फत धुम्रपानविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. यशवंत इंगळे यांनी केली.
डॉ. संदीप भिरुड आणि डॉ. सुमंत गरुड यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली. तसेच तोंडातील मुखकर्करोगाच्या पूर्वलक्षणाबाबत नागरिकांनी स्वत: स्वत:ची तपासणी कशी करावी व काय दक्षता घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने वाहतूक पोलीसांना हँड सॅनिटायझर् आणि फेस मास्कचे वाटप केले. यावेळी डॉ. संतोष पिंगळे, डॉ. दीपाली पाटेकर, डॉ. शिवाजी चव्हाण, डॉ. निखिल अगरवाल, डॉ. पूजा माने, डॉ. शलाका जाधव उपस्थित होते.
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget