June 2020-आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे पांडुरंगाला साकडं, वारकऱ्यांनाही वंदन

-देवा पांडुरंगा, यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे…बळीराजाच्या शेतात, घरात सुखसमृद्धी नांदू दे…
-- उपमुख्यमंत्री अजित पवार*मुंबई, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):-  “देवा पांडुरंगा, राज्यात यंदा चांगलं पाऊसपाणी होऊ दे… बळीराजाच्या शेतात, घरात समृद्धी नांदू दे… ‘कोरोना’चं संकट दूर करुन सर्वांना चांगलं आरोग्य दे… जनतेला सुखी ठेव… कोरोनाविरुद्ध लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, आरोग्य-सफाई कर्मचारी, अंगणवाडी ताई, आशाताई, पोलिस या सगळ्या कोरोनायोद्ध्यांना बळ दे.. त्यांचं संरक्षण कर… देवा विठ्ठला महाराष्ट्राचं भलं कर, राज्यावरचं प्रत्येक संकट दूर करण्याची शक्ती आम्हाला दे…” असं साकडं पंढरपुरच्या पांडुरंगाचरणी घालत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पांडुरंगभक्तांना, वारकऱ्यांना, राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी एकदशीनिमित्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चरणी वंदन केलं असून महाराष्ट्राला, देशाला, जगाला कोरोनामुक्त कर, अशी आळवणी भगवंत विठ्ठलाकडे केली आहे. पंढरपुरच्या वारीची शेकडो वर्षांची परंपरा यावर्षीही प्रतिकात्मक पद्धतीनं कायम राखली गेली. संतांच्या पादूका परंपरेनुसार पंढरपूरला पोहचल्या, याचा आनंद व्यक्त करत असतानाच कोरोनाचं संकट लक्षात घेऊन आपापल्या घरी थांबून, आषाढी एकदशीला घरूनच पंढरपूरच्या विठ्ठलाचं स्मरण, पूजा, भक्ती करत असलेल्या लाखो वारकऱ्यांनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केलं आहे. त्यांचे आभार मानले आहेत. पुढच्या एकादशीला कोरोनाचं संकट जगातून हद्दपार झालेलं असेल आणि पुन्हा आपण नाचत, गाजत पंढरपूरची वारी करु, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाचं संकट लक्षात घेऊन पांडुरंगभक्तांनी, राज्यातील जनतेनं अधिक काळजी घ्यावी. असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.


पिंपरी (टाईम न्यूजलाईन  नेटवर्क) –विशालनगर येथे 
पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाकडून  एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करून अटक केली  ही कारवाई सोमवारी (दि. 29) सकाळी सव्वा सातच्या सुमारास करण्यात आली.
आरोपी विक्‍या घिसाडी उर्फ विकास बबन पवार (वय 48, रा. शिवशक्ती तरुण मंडळ, रेल्वे लाईन जवळ, दापोडी पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 
सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास पोलीस नाईक रोहीदास बोऱ्हाडे यांना मिळाली की, एक व्यक्ती विशालनगर येथील चोंधे लॉन्स, नदीच्या पुलाजवळ पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला.काही वेळेत एक व्यक्ती कापडी पिशवी घेऊन संशयितरित्या फिरताना दिसला.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या पिशवीत काय आहे, असे विचारले असता त्याने पिशवी लपवून त्यात काहीही नसल्याचे पोलिसांना सांगितले. तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी त्याची पिशवी तपासली असता त्यात एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. आरोपी विक्‍या याने तो गावठी कट्टा विक्री करण्यासाठी आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. 

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ ऊंडे, निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय गुळीग, उपनिरीक्षक यशवंत साळुंके, कर्मचारी रोहीदास बोऱ्हाडे, कैलास केगले, सोमनाथ असवले, विनायक देवकर, शशिकांत देवकांत, अरुण नरळे, नितीन खोपकर, अनिल देवकर, दिपक पिसे, हेमंतकुमार गुत्तीकोंडा यांच्या पथकाने केली आहे.

वसई (टाईम न्यूजलाईन नेटवर्क)-  नालासोपारा पूर्वेतील डॉन लेन, बाबुलपाडा येथे पोटच्या तीन मुलींची गळा चिरून हत्या केलेल्या जन्मदात्या बापाने स्वतः देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली आहे
 पिता कैलास विजू परमार (35 ) हा आपल्या कु. नयन परमार (12 ) , कु.नंदिनी परमार (7 ) आणि कु.नयना परमार (3 ) अशी नावे आहेत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,परमार तीन मुलींसह बाबूलपाडात राहत होता. मात्र सहा महिन्यापूर्वी कैलासची पत्नी त्याच्यापासून वेगळी  राहत असल्याने घरामध्ये तो आपल्या तिघा मुलीसोबत राहत होता. दरम्यान शनिवारी रात्री उशिरा 10,30 च्या सुमारास कैलास परमार याने चक्क आपल्या तीन मुलींची चाकूने गळा चिरून हत्या केली आणि नंतर स्वत:वर देखील चाकूने वार करून आत्महत्या केली आहे. परिणामी या हत्येमागचे नेमके कारण अजूनही समजू शकले नसून तुळींज पोलीस अधिक तपास करत आहेत.पुणे (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): -  आषाढी वारीची परंपरा चालू ठेवण्यासाठी प्रतिकात्मकरित्या व प्रतिनिधीक स्वरुपात काही महत्वाच्या संतांच्या पादुका ज्या परंपरेने विठ्ठल – रुक्मणीच्या भेटीस जातात. त्यांना मर्यादित स्वरुपात व केवळ संतांच्या पादुका एसटी्द्वारे अथवा वाहनाद्वारे आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच  30 जून 2020 रोजी दशमीला श्री क्षेत्र पंढरपुर येथे नेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान,  , श्री संत तुकाराम महाराज संस्थान, , श्री संत सोपानदेव महाराज संस्थान,  श्री संत चांगवटेश्वर देवस्थान,श्रीक्षेत्र सासवड, या चार पालखी संतांच्या पादुका घेवून परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत योग्य ते नियोजन करण्याकरीता  आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार इन्सीडेंट कमांडर म्हणून नेमणूका करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.
                       दरवर्षी आषाढी वारीमध्ये संपुर्ण महाराष्ट्रातून मोठया प्रमाणात लाखोंच्या संख्येने भाविक संतांच्या पालखी सोबत पंढरपूर येथे जात असतात. सध्या महाराष्ट्रात मोठया प्रमाणात  कोरोना संसर्गाच्या वाढीस आळा घालणेसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सर्वसामान्य नागरीकांना व जनतेला होऊ नये यासाठी पायी-पालखी वारी करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
          श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची,  करीता उपविभागीय अधिकारी, खेडचे संजय तेली (मो.नं.9405583799), श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू,  करीता महसूल नायब तहसिलदार, हवेलीचे संजय भोसले (मो.नं.9960171046), श्री संत सोपानदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र सासवड, करीता निवासी नायब तहसिलदार, दौंडचे सचिन आखाडे (मो.नं.7875078107), श्री संत चांगवटेश्वर देवस्थान,श्रीक्षेत्र सासवडकरीता  महसूल नायब तहसिलदार, पुरंदरचे उत्तम बढे  ( मो.नं.9402226218) अशा प्रकारे नुसार इन्सीडेंट कमांडर म्हणून नेमणूका करण्यात आल्या आहेत.
        नेमणुका करण्यात आलेल्या इन्सीडेंट कमांडर यांनी पादुका प्रस्थान केल्यापासून ते परत प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत नेमून दिलेल्या पालखी संस्थांच्या सोबत राहणे आवश्यक असून संबंधित उपविभागीय अधिकारी व संस्थानच्या प्रमुखांशी विचार विनिमय करुन पादूकांचा मार्ग निश्चित करावा व सदर पादुका घेवून जाणा-या बसेस पंढरपूर येथे रात्री 11.00 वाजेपर्यंत पोहचतील याबाबत योग्य ते नियोजन करण्यात यावे. प्रवासा दरम्यान दर्शनाला कोणत्याही ठिकाणी बस थांबविण्यात येऊ नये. तसेच संतांच्या पादुकांसोबत जाणा-या सर्व व्यक्तींनी मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. 
                      तसेच या पादुकांचे प्रस्थान झालेपासून पंढरपूर येथे पोहचेपर्यंत व परत पंढरपूरहून प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत सुरक्षित पोहचतील याबाबत जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी सोलापूर यांनी नियुक्त केलेल्या विनोद पाटील, श्री रुक्मणीच्या मंदिर समिती, पंढरपूर ( संपर्क क्र. 8408026069) यांच्याशी समन्वय करुन योग्य ते नियोजन करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

                                                               

:बावधन येथील घटना

:एकूण 67 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त

पिंपरी, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क) - गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही घटना बावधन येथे मंगळवारी (दि. 23) रात्री घडली.
कुणाल अनिल रजपूत (वय 29, रा. क्षत्रियनगर, बावधन, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक दिनकर परशुराम भुजबळ यांनी बुधवारी (दि. 24) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रजपूत हा गांजा विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केले. त्यांच्याकडून 17 हजार रुपये किंमतीच 850 ग्रॅम गांजा, रोख 300 रुपये आणि 50 हजार रुपयांची दुचाकी असा एकूण 67 हजार 300 रुपयांचा ऐवज जप्त केला. सहायक निरीक्षक आनंद पगारे याबाबत अधिक तपास करीत आहेत.पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस उपनिरीक्षकास 5 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. 
फारुख सय्यद सोलापूरे असे पकडण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, फारुख सोलापूरे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांना येथील एका चौकीत नेमणुक देण्यात आली होती. दरम्यान यातील तक्रारदार यांना 5 लाख रुपयांची लाच मागितली. त्यात पडताळींत 5 लाख घेताना आज एसीबीने रंगेहात पकडले आहे. 

खासदार बारणे यांची पनवेल महापालिका आयुक्तांना सूचना

पनवेल, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क) - महापालिका कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. प्रशासनाने नियोजनपूर्वक काम केले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असून अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता पावसाळा सुरु झाला आहे.  पावसाळ्यात रुग्ण वाढीची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने तयारी करावी. आवश्यकतेनुसार खासगी रुग्णालयातील बेड आरक्षित करावेतअशा सूचना मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आयुक्तांना केल्या.

खासदार श्रीरंग बारणे यांनी पनवेल शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा बुधवारी (दि.17) पालिका मुख्यालयात आढावा घेतला. पनवेल शहरातील कोरोनाची सद्यपरिस्थीती काय आहे. किती रुग्ण आहेत. याची सविस्तर माहिती घेतली. बैठकीला महापौर डॉ. कविता चोतमलआमदार प्रशांत ठाकूर,पालिका आयुक्त सुधाकर देशमुखउपायुक्त डॉ. सुनील शिंदेशिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत,महानगरप्रमुख रामनाथ शेवाळे उपस्थित होते. पालिकेने उभारलेल्या  100 खाटांची सुविधी असलेले कोरोना कोविड सेंटरची पाहणी केली. देण्यात येणा-या सुविधांची माहिती घेतली. त्याबाबत विविध सूचना केल्या.

खासदार बारणे म्हणालेकोरोनाच्या काळात पनवेल महापालिका प्रशासनाने चांगले काम केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या 254 सक्रिय रूग्ण आहेत. अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना आपल्यातून गेला नाही. त्यामुळे सतर्कता राहून काळजी घ्यावी.

आता पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात रुग्ण वाढीची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने तयारी सुरु करावी. प्रादुर्भाव वाढत असेल. तरखासगी रुग्णालयातील बेड आरक्षित करावेत.

  जास्तीत-जास्त नागरिक एकत्र येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सुरक्षित अंतराचे पालन करावे. सम-विषय तारखेत दुकाने चालू ठेवावीत. प्रादुर्भाव वाढणार नाही. याची दक्षता घ्यावीअशा सूचना खासदार बारणे यांनी केल्या आहेत.


पुणे(टाईम न्यूजलाईन नेटवर्क): पुण्यात सुखसागरनगर परिसरात एकाच कुटूंबातील चाैघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये दोन चिमूरड्यांचा देखील समावेश आहे. अतुल दत्ता शिंदे (वय 33 ),जया अतुल शिंदे (वय 32),ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) अंतरा अतुल शिंदे (वय 3, राहणार सर्वजन सुखसागर नगर गल्ली नं 1 अहिरन्त सर्वे नं 15/1) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. ही घटना गुरूवारी रात्री अकराच्या सुमारास   उघडकीस आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, एक दिवस घराचा दरवाजा न उघडल्यामुळे शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. फॅनच्या अॅंगलला नायलाॅनच्या दोरीने चाैघांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. अतुल शिंदे हे शाळेतील मुलांचे आयडेंटीकार्ड तयार करण्याचा व्यवसाय करत होते.पुणे, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क)

:-  कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज स्पष्ट केले.
पुणे येथील विधान भवनच्या 'झुंबर हॉल'मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, उपायुक्त श्रीमती साधना सावरकर, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी, श्रमीक मुक्ती दलाचे प्रतिनिधी चैतन्य दळवी, तर 'व्हिडीओ कॉन्फरसिंग'द्वारे श्रमीक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत  पाटणकर, साता-याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी आदींसह  सबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात शासन सकारात्‍मक आहे. या अनुषंगाने पात्र खातेदारांचे संकलन तयार करण्यासंदर्भात कार्यवाही करण्‍यात यावी. यासाठी विविध विभागांच्‍या कर्मचा-यांची सेवा घेत काम पूर्ण करावे, असेही त्‍यांनी सांगितले. चुकीच्या पद्धतीने किंवा दुबार जमीन वाटप झाले असेल तर जमीन वाटप रद्द  करण्यात येईल, सांगली व सोलापूर जिल्हयात उपलब्ध जमिनी कोयना प्रकल्पग्रस्तांना देणे शक्य आहे का, याबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल तसेच ऊर्जा विभागाकडे प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित बाबीसंदर्भात शासनस्तरावरून निर्णय घेण्यात येईल.
सांगली जिल्हयातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भातही मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेउन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगतानाच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या बैठका घेत प्रश्नांच्या सोडवणुकीला गती द्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.
विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी कोयना प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत माहिती दिली. श्रमीक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी कोयना धरणग्रस्तांच्या संकलन व जमिनीची उपलब्धतेचा विषय तसेच इतर प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अशी मागणी केली.पुणे,(टाईम न्यूजलाईन नेटवर्क):- शासनाच्या दिनांक  24 मे 2020 च्या मार्गदर्शक तत्‍वांनुसार परदेशातून आलेल्या  प्रवाशांना  सात दिवसांसाठी संस्‍थात्‍मक क्‍वारंटाइन होणे बंधनकारक आहे. असे असून सुद्धा अश्विन कुमार (वय वर्षे 31)  हे दिनांक 16 जून रोजी विमानाने युकेहून  मुंबईला आले व नंतर हंडेवाडी (तालुका हवेली, जिल्हा पुणे) येथील  त्यांच्या घरी परस्पर निघून गेले.  त्या वेळी कार्यरत असलेल्या  पुणे महापालिकेचे  नोडल अधिकारी अजित सणस यांनी घरी जाऊन त्याला समजावून सांगितले.  तथापि, त्याने इन्स्टिट्यूशनमध्ये क्‍वारंटाइन होण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्‍हा परिषदेचे गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्‍या आदेशावरुन संबंधितांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून भारतीय दंड संहिता 1860 कलम 188, 270 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51,  महाराष्ट्र कोविड 19 विनियमन 2020 कलम 11 व साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 2 प्रमाणे प्रगती उल्‍हास कोरडे यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) येथे गुन्हा दाखल केला असल्‍याचे उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी कळवले आहे.


:दापोडीतील  घटना
:प्रॉपटी व पैशाच्या कारणावरून भांडण होत होते
:भोसरी पोलिसांनी केली मुलाला अटक

पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):- दापोडी येथे प्रॉपटी व पैशाच्या कारणावरून जन्मदात्या वडिलांना दोरीने बांधून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. ही घटना  मंगळवारी (दि.16) घडली.

सुनील मुतय्या पोलकम (वय 68, रा. भाटीया चाळ, दापोडी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा राजेश सुनील पोलकम (वय 38, रा. इंद्रायणीनगर, दापोडी) असे पोलिसांनी अटक केलेल्या मुलाचे नाव आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश आणि त्याचे वडिल सुनील यांच्यात नेहमी प्रॉपटी व पैशाच्या कारणावरून भांडण होत असे. मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारासही त्यांच्यात भांडण झाल्याने आरोपी राजेश याने आपल्या वडिलांना दोरीने बांधले. त्यानंतर आरोपीने त्यांच्यावर कोणत्यातरी धारदार शस्त्राने वार केला. हा प्रकार सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत सुरू होता. दरम्यान जखमी झालेल्या सुनील यांचा मृत्यू झाला. सहायक निरीक्षक गजानन बनसोडे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

:भाविकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदीर दर्शनासाठी बंद
: श्री.विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी  नित्योपोचार पाहता येणार 
:www.vitthalrukminimandir.org  हे संकेतस्थळ      
पंढरपूर.(टाईम न्यूजलाईन नेटवर्क): कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व धार्मिक स्थळे दर्शनासाठी बंद आहेत. याचाच भाग  म्हणून विठ्ठल-रुक्मिणी मंदीरही दर्शनासाठी बंद आहे. मंदीर दर्शनासाठी बंद असले तरी भाविकांना घर बसल्या विइ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घरबसल्या घेता येणार आहे. अशी माहिती विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
श्री विठ्ठल-राक्मिणीचे मंदीर  भाविकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी बंद आहे. या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणीचे सर्व  नित्योपोचार नित्य नियमाने सुरु आहेत. भाविकांना घरबसल्या दर्शन घेता यावे यासाठी www.vitthalrukminimandir.org  या संकेतस्थळाचा, गुगल प्ले स्टोअरमधून shreevitthalrukmnilive Darshan ॲप डाऊनलोड करावे   तसेच  जिओ टीव्ही वरील जिओ दर्शन आणि टाटा स्काय डीशवरील ॲक्टीव चॅनेल या माध्यमातून श्री.विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, महापूजा, शेजआरती, धूप आरती आदी  नित्योपोचार पाहता येणार आहे.
       01  जुलै 2020 रोजी आषाढी एकादशी आहे. यंदा कोरानाचे सावट असल्याने शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही भाविकांना दर्शनासाठी सोडता येणार नाही.  भाविकांनी आपल्या आरोग्याची  काळजी  घेण्यासाठी  दर्शनास पंढरपूरात येणे टाळावे.  भाविकांनी आषाढी यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी व दर्शनासाठी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीमार्फत  करण्यात आलेल्या ऑनलाईन दर्शन सुविधेचा  लाभ घ्यावा   असे आवाहन मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री. जोशी यांनी केले आहे.   


*सांगली, कोल्हापूरच्या पूरस्थिती उपाययोजनांचा*
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा*

पुणे, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क)
:- सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत तज्ज्ञांनी केलेले संशोधन, सूचवलेल्या उपाययोजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन उपाययोजनांची दिशा निश्चित करण्यात येईल. दोन्ही जिल्ह्यांतील पुरस्थितीबाबत पुढील संशोधनासाठी शासन निधी उपलब्ध करुन देईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला.

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरपरिस्थितीबाबत पुण्यातील ‘अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च’ आणि ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया’चे तज्ज्ञ संशोधन करत आहेत. या तज्ज्ञांची निरीक्षणे, संशोधन, उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विशेष बैठकीत घेतला. पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, धरण पुनर्स्थापना समितीचे जागतिक बँकेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष दीपक मोडक, तज्ज्ञ डॉ. पद्माकर केळकर, प्रा. सुधीर आगाशे, प्रा. भालचंद्र बिराजदार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सचिव प्रमिला गायकवाड, संस्थेचे सहसचिव ॲड. भगवानराव साळुंखे, सुनील ठाकरे, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तज्ज्ञ प्राध्यापक उपस्थित होते.

‘कृष्णा खोरे, पूर आणि उपाययोजनां’संदर्भात तज्ज्ञांनी सादर केलेल्या अहवालाचे सादरीकरण बैठकीत झाले.  तज्ज्ञांनी सूचविलेल्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा  करण्यात आली. धरण पुनर्स्थापना समितीचे दीपक मोडक व डॉ. पद्माकर केळकर यांनी सादरीकरण केले. कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामध्ये कोयना, राधानगरी आदी धरणांच्या सांडव्याच्या विसर्गाचा भाग 30 ते 40 टक्के असतो. धरणामध्ये पावसाळ्यात तारखेनुसार किती पाणीपातळी राखावी, याबाबत नव्याने नियोजन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. कोयना धरणाच्या पाणीपातळीबाबत तयार केलेले वेळापत्रकही श्री. मोडक यांनी यावेळी सादर केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भातील माहिती घेऊन, तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा करुन पुढील दिशा ठरवावी, असे निर्देश दिले. या दोन्ही जिल्ह्यांतील पूरपरिस्थितीवर आधारित पुढील संशोधनासाठी राज्य शासन अर्थसहाय्य उपलब्ध करून देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

--  उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

कोरोना संकटकाळातील पोलीसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान

उपमुख्यमंत्र्यांनी साधला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद
पोलिसांच्या रक्तदान शिबिराला उपमुख्यमंत्र्यांची भेट

कोरोना नियंत्रणासाठी पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे व उपक्रमांचे उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक


पुणे (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): कर्तव्य पार पाडताना माणूसकी जपत कोरोना प्रतिबंधासाठी पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीमुळे पुणे पोलीसांप्रति नागरिकांचा आदर वाढला आहे. सरहद्दीवरील जवानांप्रमाणेच राज्य पोलीसांच्या कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे आणि राज्य पोलिसांच्या कामगिरीचा गौरव केला.

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने लॉकडाऊन कालावधीत कोरोना नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच पुणे शहर पोलीस कर्मचारी बॅच 2012 च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी भेट देऊन पोलीसांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी हे गौरवोद्‌गार काढले.

 लॉकडाऊन कालावधीतील पोलिसांच्या उत्कृष्ट कामगिरीची  माहिती देणाऱ्या फलकाची पाहणीही उपमुख्यमंत्र्यांनी केली. कोरोनाच्या संकटाचा धैर्याने सामना करीत उत्कृष्ट जनसेवा केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिसांच्या कामाचे विशेष कौतुक केले. कर्तव्य बजावत असताना स्वच्छता, सुरक्षिततेची काळजी घ्या. फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळा. सॅनिटायझरचा वापर करा. आदी सूचना त्यांनी केल्या. यावेळी 'फील द बिट' पुस्तिकेचे प्रकाशनही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी पोलिसांचे विशेष कौतुक करताना सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपासून राज्यातील पोलीसांनी संवेदनशीलता दाखवत कोरोना नियंत्रणासाठी निरंतर काम करुन पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली आहे. यापुढच्या काळातही सर्वांच्या एकजुटीतून कोरोनाला राज्यासह देशातून हद्दपार करण्याचा निर्धार करुया.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचे तसेच लॉकडावून कालावधीत पोलिसांनी प्रभावीपणे केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करुन ते म्हणाले, पोलिसांना चांगली घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

 पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यावेळी म्हणाले की, लॉकडाऊन कालावधीत सोशल पोलिसिंगला प्रोत्साहन दिले पाहिजे. जनतेपर्यंत अधिकाधिक पोहचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतांना पोलिसांनी स्वत:च्या सुरक्षिततेची, आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यापुढच्या काळातही कंटेन्मेंट झोन परिसरात कडक निर्बंध राबवण्याबरोबरच जनजागृती करण्यावर भर द्यायचा आहे. पोलीस शिपायांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संकटकाळात कर्तव्यभावनेने, सामाजिक जाणीवेतून व अगदी मनापासून काम करुन कोरोना नियंत्रणासाठी योगदान दिले आहे, त्याबद्दल त्यांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही केले.

सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी लॉकडाऊन कालावधीत पुण्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरणातून माहिती दिली.

अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व स्थलांतरित मजुरांसंदर्भात पोलिसांनी बजावलेली कामगिरीबद्दल माहिती दिली. अपर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे यांनी सोशल पोलिसिंग सेलबाबत, उपायुक्त बच्चन सिंग यांनी प्रवासी पासबाबत, उपायुक्त संभाजी कदम यांनी सोशल मीडिया चित्रफिती बाबत व जनजागृती पुस्तिकांबद्दल, तर उपायुक्त वीरेंद्र मिश्र यांनी पोलीसांच्या कल्याणकारी योजनांबाबत, उपायुक्त मितेश घट्टे यांनी क्वारंटाईन प्रक्रिया व ड्रोनद्वारे नियंत्रणाबाबतची माहिती दिली. संबंधित विभागांच्या पोलीस उपायुक्तांनी त्यांच्या परिमंडळात राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी उपमुख्यमंत्र्यांना दिली.निसर्ग’चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांना पिंपरी-चिंचवडकरांतर्फे ताडपत्री वाटप

पिंपरी,  ( टाईम न्यूजलाईन नेटवर्क )
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांचे पत्रे, छत उडाल्यामुळे नागरिकांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत महेशदादा स्पोर्ट्स फांडेशनच्या पुढाकाराने कोकणवासीयांना ताडपत्री वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महेशदादा स्पोर्टस फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस बुधवारी (दि.१० जून) साजरा करण्यात आला. यानिमित्त कोकणात आलेल्या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्याचा  निर्णय घेण्यात आला.
मदत कार्याच्या पहिल्या टप्प्यात दापोलीमधील हारणे, केळशी, सुकुंडी आणि आंजर्ली या भागात ज्या नागरिकांच्या घराचे छत उडाले आहेत. कौले फुटली आहेत. पत्रे उडाले आहेत. अशा नागरिकांना ताडपत्री वाटप करण्यात आले. अनिल पवार, योगेश शहा, मयूर ओढके यांनी समन्वय करुन नागरिकांना मदत केली आहे. आगामी काही दिवस पिंपरी-चिंचवडमधून कोकणवासींना शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.


:सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, स्वच्छता व निर्जंतुकीकरण इत्यादी नियमांचे पालन करावे लागणार

देहूरोड (टाईम न्यूजलाईन नेटवर्क) : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयास श्री क्षेत्र देहु येथुन 12 जून 2020 व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयास श्री क्षेत्र आळंदी येथुन 13 जून 2020 रोजी पालखी प्रस्थान सोहळयास मंदीर परिसराच्या आतमध्ये जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत उपरोक्त निर्देशांचे पालन करुन परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी दिली.
         आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे व त्यातील पोट कलम २ (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
            दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या अनुषंगाने श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहु, व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी, येथुन पंढरपुरला जाण्यासाठी प्रस्थान करीत असतात. तरी  श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहु येथुन 12 जून २०२० व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथुन 13 जून 2020 रोजीच्या प्रस्थान सोहळयास या दोन दिवसांसाठी परवानगी देण्यात आलेली आहे.
           पुणे जिल्हयातील श्री क्षेत्र देहु व आळंदी यांचा प्रतिबंधित क्षेत्रात समावेश नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचना व निर्देशाप्रमाणे नियमावलीचे पालन करुन राखून तसेच पालखी सोहळा प्रस्थानावेळी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेल्या सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, स्वच्छता व निर्जंतुकीकरण इत्यादी नियमांचे पालन करुन दोन्ही पालखी सोहळ्याच्या प्रस्थान मंदीर परिसराच्या आतमध्ये परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी आदेशान्वये कळविले आहे.

:हिंजवडी येथील कोविड आरोग्य केंद्राचा  ऑनलाईन शुभारंभ

:विप्रोच्यावतीने अतिशय दर्जेदार व सुसज्ज रुग्णालय हिंजवडी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क) : कोरोना लढाईला तीन महिने होत आहेत, याकाळात राज्यात मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधांची निर्मिती होत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या समर्पित कोविड आरोग्य केंद्राचा ऑनलाईन पद्धतीने हस्तांतरण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते बोलत होते. 

उपमुख्‍यमंत्री तथा पुणे जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील लोकार्पण सोहळ्यास शुभेच्‍छा दिल्‍या.

     यावेळी  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे,  खासदार सुप्रिया सुळे, विप्रो लिमिटेडचे अध्यक्ष रिशाद प्रेमजी हे ऑनलाइन तर पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्क येथील आरोग्य केंद्रातून  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त डॉ दिपक म्हैसेकर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक नांदापुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, विप्रोचे उपाध्यक्ष हरिप्रसाद हेगडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे,  जिल्हा परिषदेचे सभापती प्रमोद काकडे आदी उपस्थित होते.

        यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून ते आजची परिस्थिती यामध्ये आपण सुधारणा करीत फार पुढे गेलो आहे. राज्यात प्रारंभी दोनच चाचणी केंद्र होते. आज 80 हून अधिक चाचणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. लवकरच ही संख्या 100 च्या पुढे जाईल.  कोरोना विषाणू हा संपूर्ण जगासाठी नवीन आहे. कोरोनाच्या विरुध्द लढाई लढत असतांना वेळेवर सुविधा निर्माण कराव्या लागल्या असून त्यात आपल्याला यश येत आहे, ही सकारात्मक बाब आहे. सुरुवातीला आपल्याकडे 350 आयसोलेशन बेड होते. आजच्या घडीला आयसीयू, आयसोलेशन, ऑक्सीजनयुक्त पुरेशा प्रमाणात सर्व बेड उपलब्ध आहेत.

                विप्रो हॉस्पिटलच्या बाबतीत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, विप्रो कंपनी दर्ज्‍याशी तडजोड करत नसल्याची त्‍यांची खासियत आहे. यानुसारच  विप्रोच्यावतीने अतिशय दर्जेदार व सुसज्ज रुग्णालय उभारणी करण्‍यात आली आहे. याबद्दल विप्रोच्‍या सर्व टीमचे त्‍यांनी अभिनंदन केले.

कोरोना विषाणू गुणाकाराने वाढतो, त्यामुळे आपणा सर्वांना स्वयंशिस्त पाळण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.  संपूर्ण जगात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. कोरोना सोबत जगतांना नागरिकांना स्वयंशिस्त पाळावी लागेल. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधायुक्त असलेले रुग्णालय उभारणी विप्रोने केली असून त्याचा निश्चितच भविष्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे करण्यासाठी उपयोग होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

          सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे म्हणाले, विप्रोच्या सहकार्याने अतिशय सुसज्ज हॉस्पिटल तयार झाले आहे. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी या रुग्णालयाचा निश्चितच उपयोग होईल. शासनाच्यावतीने या रुग्णालयासाठी 1 कोटी 32 लाख रुपयाचा निधी देण्यात येत आहे. अनलॉक परिस्थितीत रुग्णसंख्या वाढत असली तरी निर्माण केलेल्या सुविधांचा लाभ रुग्णांच्या उपचारासाठी होईल. आजच्या मितीला ग्रामीण भागात जरी कोवीड रुग्णांचे प्रमाण कमी असले तरी भविष्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून या रुग्णालयात व्यवस्था निर्माण केल्या आहेत, असे ते म्‍हणाले.

विप्रोचे अध्‍यक्ष रिशाद प्रेमजी म्‍हणाले, माणुसकीच्‍या भावनेतून आम्‍ही राज्‍यातीलच नव्हे तर  देशातील निराधार, बेरोजगारांना अन्‍न व औषधोपचार सुविधा देण्‍यासाठी प्रयत्‍नशील आहोत. पुणे जिल्हयाची गरज ओळखून ग्रामीण भागातील रुग्णांसाठी  समर्पित कोविड केअर हॉस्पिटल बनविण्याची तयारी दर्शविली. शासनाने त्‍यास सकारात्‍मक प्रतिसाद दिल्‍याबद्दल त्‍यांनी आभार मानले. कोरोनामुळे आरोग्‍य आणि आर्थिक समस्‍या निर्माण झाल्या असल्‍या तरी आपण सर्व यावर मात करण्‍यात यशस्‍वी होवू, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

        जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी प्रास्‍ताविक केले. त्‍या म्हणाल्या, कोरोनाच्या संकटकाळात पुणे जिल्हा परिषद कार्यक्षमतेने काम करीत आहे. संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचे सुसज्ज  समर्पित कोविड आरोग्य केंद्र पीपीपी मॉडेल मधून सुरु करण्याचा देशात पहिला मान पुणे जिल्हा परिषदेने मिळवला आहे. पुणे जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात 27 ठिकाणी तपासणी केंद्रे व 60 ठिकाणी उपचार सुविधा उभ्या केल्या आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यात जिल्हा परिषद प्रशासन नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

        विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, कोविड आरोग्य केंद्राच्या उभारणीकरीता दीड महिन्यापूर्वी पाहणी केली होती. कोविड 19 विषाणूचे संकट लक्षात घेता दीड महिन्यात पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने 450 रुग्ण क्षमता असलेले रुग्णालय उभारण्यात आले असून आज रुग्णांच्या सेवेसाठी दाखल होत आहे.:जिल्हाधिकारी नवल किशोर राम

: प्रकल्प ग्रस्तांना लवकरात लवकर लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध


 : भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांशी संवाद साधून जाणून घेतल्या अडीअडचणी

: शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून काम करण्यासाठी प्रशासन तत्पर

: खेड तहसीलदार कार्यालयाला भेट व कामकाजाचा आढावा


राजगुरूनगर ,(टाईम न्युजलाईन नेटवर्क): भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. जलवाहिनीचे कामकाज, प्रकल्प ग्रस्तांना जमीन वाटप, जमीनीचा मोबदला वाटप आदी प्रश्नांबाबत स्थानिक परिस्थिती पाहून व संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय लवकरच घेतला जाईल, तसेच पुढील आठवड्यात पुन्हा प्रकल्प ग्रस्तांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. प्रकल्प ग्रस्तांना रोख रक्कम वाटप करताना गैरप्रकार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

   जिल्हाधिकारी श्री. राम यांनी आज भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तत्पूर्वी खेड तहसीलदार कार्यालयाला भेट देऊन येथील कामकाजाचाही त्यांनी आढावा घेतला. यावेळी खेड उपविभागीय अधिकारी संजय तेली, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, पोलीस उपअधीक्षक गजानन टोणपे, तहसीलदार सुचित्रा आमले-पाटील, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व प्रकल्प ग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

  प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांना जमीन व मोबदला मिळवून देण्यात गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्यास प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी. तक्रारीची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले.

भामा आसखेड प्रकल्प ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासन तत्पर आहे. खेड तालुक्यातील प्रकल्प ग्रस्तांच्या जमीन वाटपा बाबतचे व रोख रक्कम वाटपाचे कामकाज खेड उपविभागीय कार्यालयाकडे वर्ग करण्यात येईल, असेही श्री. राम यांनी सांगितले.


  यावेळी भामा आसखेड प्रकरणाचा आढावा घेऊन प्रकल्प ग्रस्तांच्या अडचणी त्यांनी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांचे हित पाहून काम करा, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. राम म्हणाले, भामा आसखेड  प्रकल्पग्रस्तांना न्यायालयाच्या आदेशानुसार व शासनाच्या मान्यतेनुसार जमीन वाटप करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला लवकर मिळवून द्यावा. शेतकऱ्यांना रक्कम वाटप करताना गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच भूमीहीन शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळवून द्यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. राम यांनी केल्या.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी 68 धरणग्रस्तांना जमिनीचे एकाच दिवसात वाटप केले, याबाबत जिल्हाधिकारी श्री राम यांना यावेळी प्रकल्प ग्रस्तांनी धन्यवाद दिले. यापुढेही प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी विनंती उपस्थित शेतकऱ्यांनी केली.

     
- राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन
- शाळा सुरू करताना पालकांचा विचार करण्याची मागणी

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
पिंपरी-चिंचवडसह राज्यात कोविड-19 रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून शाळा- महाविद्यालये सुरू करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. परिणामी, कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्याशिवाय शाळा किंवा महाविद्यालये सुरू करु नयेत, अशी पालकांची मागणी आहे. त्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करु नयेत, अशी मागणी पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की,  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सर्वप्रथम शाळा-महाविद्यालये तत्काळ बंद केली, आता त्या पुन्हा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे.  या निर्णयाचा फेरविचार करावा लागले. कारण, इस्त्राईलमधील शाळा सुरू करण्याची चूक महागात पडली आहे. इस्त्राईलमधील १२० शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. अवघ्या तीन आठवड्यात या शाळांमधील ३४७ विद्यार्थी व शिक्षक कोरना पिझिटिव्ह झाले आणि संभाव्य धोका ओळखून सरकारने तत्काळ पुन्हा सर्व शाळा बंद केल्या. आज सुमारे १६ हजार विद्यार्थ्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्याच वेळ ईस्त्राईलवर आली आहे. पालक चिंताग्रस्त असून, प्रशासनाच्या निर्णयावर संतापले आहेत. शाळा-महाविद्यालये सुरू केल्यास काय परिणाम होतील. याचा दाखला ईस्त्राईलच्या रुपाने बोलका आहे. शाळा सुरू करुन पुन्हा बंद करण्याची वेळ येवू नये.
दुसरीकडे, कोरोना आणि लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिकांचे रोजगार आणि नोकरी गेली आहे. दोन महिन्यांचा पगार अनेकांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीत दैनंदिन खर्च कसा भागवायचा याची चिंता पालकांना आहे. अशा परिस्थितीत शाळा-महाविद्यालयांनी शालेय शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा सुरू केला आहे.  तसेच, व्हर्च्युअल वर्ग सुरू करुन मोबाईल- टॅब खरेदीसाठी सूचना केल्या जात आहेत.
अपणांस विनंती की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क माफ करण्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा. तसेच, डोनेशन अथवा विकास निधीबाबत पालकांना शाळा प्रशासनाने वेठीस धरू नये, याची योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.
तसेच, राज्य सरकारने शाळा सुरू करुन पालकांची चिंता वाढवू नये. सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तरीही पिंपरी-चिंचवडमधील एकही शाळा भारतीय जनता पार्टी सुरु होवू देणार नाही. अगोदर संसद, विधानसभा, शासकीय सर्व कार्यालये सुरू करा. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, असा इशारा पिंपरी-चिंचवड भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिला आहे.
मुलांचे वर्ष वाया जावू नये; पालकांची अपेक्षा 
दरम्यान, शाळा सुरू करुन विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल, असा निर्णय राज्य सरकारने सध्यातरी घेवू नये. तसेच, शालेय शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावणाऱ्या शाळांवर कारवाई करावी. विशेष म्हणजे, मुलांचे वर्ष वाया जाणार नाही. याचाही सरकारने विचार करावा, अशी मागणी पालक संघटनांकडून होत आहे. त्यामुळे राज्य सकारने शाळांबाबत निर्णय घेताना पालक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.


पुणे,: मावळ तालुक्यातील भुशी डॅम व इतर धरण परिसरामध्ये   वर्षा पर्यटनासाठी मनाई असल्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत.
                     पुणे जिल्हयातील मावळ, मुळशी, हवेली, आंबेगाव, जुन्नर, भोर व वेल्हा या सर्वात जास्त पाऊस होणा-या तालुक्यामध्ये असणा-या भुशी, मुळशी, भाटघर, खडकवासला धरण परिसरात मोठया प्रमाणात नागरिक वर्षापर्यटनासाठी येत असतात. पाऊस सुरु झाल्यानंतर मुंबई व राज्याच्या इतर जिल्हयातून अनेक पर्यटक वर्षापर्यटनासाठी  येत असतात. मावळ तालुक्यातील भुशी डॅम व लोणावळा परिसर, मुळशी तालुक्यातील मुळशी धरण व ताम्हीणी घाट परिसर, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण व गड किल्ले परिसर व वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण व परिसर येथे दर शनिवार, रविवार व सुट्टीच्या मोठया प्रमाणात नागरिकांची गर्दी होते. यापूर्वी धरण परिसरात व इतर भागात नागरिकांच्या होणा-या गर्दीमुळे पाण्यात बुडून तसेच पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मयत होणा-या व्यक्तींच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
या धरण क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने भुशी डॅम व इतर धरणातून खबरदारीचा उपाय म्हणून अचानक पाण्याचा विसर्गात वाढ होत असते. अचानक पाण्याच्या विसर्गात वाढ झाल्याने पाण्यात पर्यटक वाहून मयत होण्याच्या घटनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक पर्यटक यांच्याकडून मद्यपान व हुल्लडबाजीच्या घटना देखील मोठया प्रमाणात घडलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या प्रचंड गर्दीमुळे व इतर घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. या कारणामुळे मागील दोन वर्षामध्ये भुशी धरण व इतर धरणामध्ये बुडून जीवित हानी झालेली आहे. यावर्षी कोरोना आजाराच्या अनुषंगाने व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून या  ठिकाणी जाण्यास नागरिकांना बंदी घालणे आवश्यक असल्याचेही  जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 30 (2) (3) (4) अन्वये जिल्हयात भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भुशी डॅम व इतर धरण परिसरामध्ये पर्यटनासाठी बंदी करण्यात येत आहे. या आदेशाचा कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उल्लंघन केल्यास ते आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 नुसार दंडनिहाय कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम  यांनी सांगितले आहे.

उप मुख्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 'निसर्ग' चक्रीवादळामुळे
मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी  येथील झालेल्या नुकसानीची पहाणी केली. यावेळी आ. सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही पहाणी केली.
निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून त्यासाठी पहाणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. उद्या लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात योग्य ते निर्णय घेवून मदत केली जाईल. आम्ही केंद्र सरकार कडे मदत मागितली असून केंद्रीय पथक पहाणी करण्यासाठी येणार आहे.


                                    
*वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

* कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी असणाऱ्यांच्या कामाचे कौतुक

* आवश्यक त्या मूलभूत सेवा-सुविधा यापुढेही राज्य शासन गतीने उपलब्ध करुन देणार

* कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे

* रुग्णांना तात्काळ वैद्यकीय उपचार उपलब्ध करुन द्यावेत 

* कोमॉर्बिलिटी नागरिकांची विशेष काळजी घ्यावी

  पुणे,(टाईम न्युजलाईन   नेटवर्क)
:  जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाने सुक्ष्म नियोजन करुन कोरोनाचा रुग्ण दर व मृत्यू दर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केल्या.
      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजना तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये देण्यात येत असलेल्या सेवा सुविधा, आवश्यक वैद्यकीय साधनसामग्री व आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
  बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्ती एस. चोक्कालिंगम, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे प्रभारी अधिष्ठातता डॉ. मुरलीधर तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदींसह  विविध विभागांचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
      बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांचे म्हणणे व सूचना ऐकून घेतल्यानंतर श्री. देशमुख म्हणाले, शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना बेडच्या उपलब्धतेबद्दल माहिती होण्यासाठी तसेच वेळेत वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी प्रशासनाने शासकीय व खाजगी रुग्णालयाचे व्यवस्थापन योग्य तऱ्हेने हाताळावे. कोविड-19 विरुध्दच्या लढाईत आरोग्य विभाग अग्रेसर आहे. आरोग्य विभागासह या लढ्यात सहभागी असणाऱ्या अन्य विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. तसेच या काळात आरोग्य व अन्य विभागात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर, परिचारीका, स्वच्छता कर्मचारी आदींना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याची दक्षता घेवून आवश्यक तपासणी करुन घ्यावी, असे सांगून कोरोनामुळे आजवर काहींना आपला जीव गमवावा लागला, त्याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले.  रुग्णांवर वेळेत उपचार होण्यासाठी राज्य शासन सुरुवातीपासूनच सक्रीय आहे. शासकीय तसेच खाजगी रुग्णांलयांना पीपीई कीट, मास्क, सॅनिटायझर, औषधसाठा कमी पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असून यापुढेही राज्य शासन आवश्यक त्या सेवा सुविधा गतीने उपलब्ध करुन देईल, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.
  कोरोनाच्या अनुषंगाने घ्यावयाच्या दक्षतेबद्दल जनजागृतीवर भर देणे आवश्यक आहे. कोविड बरोबरच अन्य आजारांच्या रुग्णांकडे दुर्लक्ष होता कामा नये, याची दक्षता घ्यावी.  झोपडपट्टी परिसरात तपासणी क्षमता वाढवून उच्च रक्तदाब,  मधुमेह, श्वसन विकार आदी आजार असणाऱ्या (कोमॉर्बिलिटी) नागरिकांची विशेष काळजी घ्यावी, असे सांगून  त्यांच्यावर प्रतिबंधात्मक  उपाययोजना म्हणून  निर्धारीत करण्यात आलेला औषधोपचार करावा, असेही ते म्हणाले.
    अन लॉकच्या अनुषंगाने बोलताना श्री. देशमुख म्हणाले, त्या-त्या भागात परिस्थिती नुसार निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. तथापि, कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. रुग्ण संख्या नियंत्रणात येण्यासाठी नागरिकांनी देखील सोशल डिस्टनसिंग व स्वच्छतेचे नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. खाजगी व शासकीय डॉक्टरांनी समन्वयाने काम करावे, असेही ते म्हणाले.
  यावेळी  कोरोनाच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेले नियंत्रण कक्ष, शासकीय व खाजगी रुग्णालयाचे व्यवस्थापन, प्रशासनाच्या उपाययोजना, स्वॅब तपासणी क्षमता, मिशन बिगीन अगेन.. आदी विविध विषयांचा आढावा श्री. देशमुख यांनी घेतला.
    विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागात आजवर तपासणी करण्यात आलेले नागरिक, यापैकी बाधित रुग्ण, मृत्यू झालेल्या नागरिकांची वैद्यकीय पार्श्वभूमी, बरे होवून घरी गेलेल्यांची संख्या, करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
  एस. चोक्कलिंगम यांनी ससून रुग्णालयाच्या वतीने देण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा-सुविधांची माहिती दिली.
  महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रुग्णदर व मृत्यूदर कमी होण्यासाठी महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या व यापुढील कालावधीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
    मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.
  ससूनचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी ससून रुग्णालयामध्ये आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, वयोमानानुसार रुग्ण दर, मृत्यूदर, क्षेत्रनिहाय दाखल रुग्ण, अतिदक्षता विभाग व अन्य विभागात देण्यात येत असलेल्या सुविधा आदींची माहिती दिली.
    यावेळी संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधाच्या अनुषंगाने सविस्तर माहिती दिली.
-आपत्कालिन मदत यंत्रणेचे मानले आभार*
-पुणे शहर व जिल्ह्यात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा उपमुख्यमंत्र्यांनी घेतला लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडून आढावा

मुंबई, (टाईम न्युजलाईन नेटवर्क):-  ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनाची संवाद साधून जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. चक्रीवादळाच्या संकटकाळात मदतकार्यात सहभागी झालेले लाईफ गार्ड, पोलिस, संरक्षण दलांचे, एनडीआरएफचे जवान, स्थानिक स्वराज संस्थांचे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आपत्कालिन यंत्रणेतील, कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, नगारिकांचे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर आभार मानले आहेत.
पुणे शहरात तसंच मावळ, आंबेगाव, जुन्नर, खेड, वेल्हे, मुळशीसह इतर तालुक्यातही वादळानं मोठे नुकसान केले आहे. घरं, शाळा, अंगणवाड्या, गुरांचे गोठे, भाजीपाल्याची पिके, फळबागांचं झालेलं नुकसान प्रचंड आहे. पोल्ट्री शेड, कांदा चाळी, पॉली हाऊसचे पत्रे उडून गेल्याचे प्रकार घडले आहेत. वीजेच्या तारा व खांब मोडून पडल्यानं वीजयंत्रणेचंही नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यात आणखी एक-दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील लोकप्रतिनिधींशी संवाद साधून सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासकीय अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन नुकसानीबद्दलची माहिती जाणून घेतली. पंचनामे पूर्ण होऊन अहवाल येताच मदतीबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : तंबाखूजन्य पदार्थ सिगारेट व गुटखा याबाबत असणा-या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी मागणी इंडियन डेंटल असोसिएशनचे (आयडीए) पिंपरी चिंचवड अध्यक्ष व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे दंतरोगविभाग प्रमुख डॉ. यशवंत इंगळे यांनी केली. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त इंडियन डेंटल असोसिएशन पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील मुख्य चौकांमध्ये असोसिएशनच्या सदस्यांनी फिजिकल डिस्टनसिंगचे निकष पाळून तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत फलक दाखवुन जनजागृती केली. शहरातील मुख्य चौकांत कार्यरत असणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व वाहतूक पोलीस तसेच नागरिकांना तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत माहिती दिली.
कोरोना महामारीच्या कालावधीत केंद्र आणि राज्य सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन मुळे शहरातील तंबाखू, सिगरेट आणि तंबाखू युक्त पदार्थ विकणारी दुकाने बंद असल्यामुळे धुम्रपानाचे प्रमाण कमी झाले असे वाटत असले तरी, लॉकडाऊन संपल्यानंतर यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची भीती आहे. तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट, गुटखा यामुळे कॅन्सरसारखे जीवघेणे आजार उद्‌भवतात. याबाबत वेळोवेळी इंडियन डेंटल असोसिएशनच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. राज्यात गुटखाबंदी असली तरी अनेक छोटे, मोठे व्यावसायिक काळ्या बाजाराने गुटखा विक्री करतात. तसेच अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी कायद्याचे उल्लंघन करीत धुम्रपान करतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यसरकारने वर्षभर जनजागृतीचे उपक्रम राबवावेत. तसेच आरोग्य निरीक्षक व पोलिसांमार्फत धुम्रपानविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. यशवंत इंगळे यांनी केली.
डॉ. संदीप भिरुड आणि डॉ. सुमंत गरुड यांनी तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल माहिती दिली. तसेच तोंडातील मुखकर्करोगाच्या पूर्वलक्षणाबाबत नागरिकांनी स्वत: स्वत:ची तपासणी कशी करावी व काय दक्षता घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने वाहतूक पोलीसांना हँड सॅनिटायझर् आणि फेस मास्कचे वाटप केले. यावेळी डॉ. संतोष पिंगळे, डॉ. दीपाली पाटेकर, डॉ. शिवाजी चव्हाण, डॉ. निखिल अगरवाल, डॉ. पूजा माने, डॉ. शलाका जाधव उपस्थित होते.:या प्रकरणात हलगर्जीपणा समोर आल्याने कारवाई 

पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):- २००२ मध्ये पिंपळे-निलख येथील औंदूंबर सोसायटीत फ्लॅट घेतला होता. तो फ्लॅट त्याने बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना विकला. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फसवणूक प्रकरणी ताब्यात घेतलेल्या सोलापूर महापालिकेच्या उपमहापौराला सोडून देण्यात आले. या प्रकरणी पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी सांगवी पोलिस ठाण्याच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले असून, उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

राजेश दिलीप काळे (४२, रा. सोलापूर) असे समजपत्र देऊन सोडलेल्या सोलापूरच्या उपमहापौराचे नाव आहे. आरोपी काळे यांनी २००२ मध्ये पिंपळे-निलख येथील औंदूंबर सोसायटीत फ्लॅट घेतला होता. तो फ्लॅट त्याने बनावट कागदपत्रे तयार करून अनेकांना विकला. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सांगवी पोलिस ठाण्यातील पथकाने २९ मे रोजी काळेला सोलापूर येथून ताब्यात घेतले होते. मात्र,  शनिवारी (ता. ३०) अचानक काळे यांना शिंका येऊ लागल्या. सध्या करोनाची साथ असल्याने काळे यांना उपचार करण्यासाठी समजपत्र देऊन त्यांना सोडण्यात आल्याचे सांगवी पोलिसांनी सांगितले. मात्र, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, या प्रकरणात हलगर्जीपणा समोर आल्याने सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले. तर उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.:तीन अज्ञात व्यक्‍तींनी विरुध्द केला गुन्हा दाखल


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क): - तीन अज्ञात व्यक्‍तींनी केलेल्या हल्ल्यात एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. ही घटना मोरवाडी, पिंपरी येथे घडली. राजू गोपाळ जानराव (वय 36, रा. लालटोपीनगर, पिंपरी) असे खून झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. रफीक अमीर मनेर (वय 45, रा. वाघेरे पार्क, पिंपरीगाव) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 2) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तीन अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू जानराव हे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या दुसऱ्या सुरक्षा रक्षकाचे काही तरुणांशी भांडण झाले होते. त्या सुरक्षा रक्षकाला मारण्यासाठी ते तीन तरुण हातात लाकडी दांडके घेऊन आले होते. मात्र तो सुरक्षा रक्षक मिळाला नाही म्हणून हल्लेखोर तरुणांनी जानराव याच्याशी हुज्जत घातली.
त्यानंतर जानराव यास स्मशानभूमीजवळ लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. जीव वाचविण्यासाठी जानराव आपल्या घराकडे म्हणजे लालटोपीनगरकडे पळाला. मात्र लालटोपीनगरच्या बाहेर पुन्हा जानराव याला गाठून लाकडी फळीने डोक्‍यात मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या जानराव याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना आरोपींबाबत माहिती मिळाली असून लवकरच त्यांना अटक करू, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्‍त केला. मात्र या घटनेत एकाचा नाहक जीव गेल्याने लालटोपीनगर परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.


नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क):-  चिंचवड येथील रस्टन कॉलनी, पवनानगर, तानाजीनगर येथील काँक्रीटीकरणाची कामे सुरु होती. कोविडच्या संकटकाळात कामे बंद राहिली. पण, कोविडच्या संकटकाळापर्यंत अपेक्षित काम का झाले नाही, याचा आढावा घेणे अत्यंत गरजेचे आहे. अर्धवट अवस्थेतील कामे अपघातास निमंत्रण देत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी तातडीने रस्त्यांची तात्पुरती दुरुस्तीची कामे करावीत, अशी मागणी शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका चिंचवडे यांनी म्हटले आहे की,          प्रभाग क्रमांक 18 चिंचवड येथील रस्टन कॉलनी, पवनानगर, तानाजीनगर या भागात सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरु होती.  ठेकेदारांनी दिरंगाई केल्याने ही कामे अर्धवट राहिली आहेत. कोविड 19 या संकटकाळात कामे बंद राहिली. संकटापुर्वी अपेक्षित काम का झाले नाही, याचा आढावा घेणे अत्यंत गरजेचे आहे. अर्धवट अवस्थेत असलेली कामे अपघातास निमंत्रण देतात.

दोन दिवस झालेल्या पावसामुळे खड्डे, राडारोडा, उघड्या पडलेल्या केबल, ड्रेनेज, पावसाळी गटर नलिकांची झाकणे अर्धवट व उघडी अस्ताव्यस्त पडली आहेत. व ठिक-ठिकाणी डबकी साचली आहेत. यामुळे अपघात व साथीचे आजार होऊ शकतात.

सर्व उद्योग व्यावसाय पूर्ववत होत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकारीवर्ग यांना ही कामे त्वरीत पूर्ण करण्याकरिता वेळ लागणार आहे. हे लक्षात घेऊन   नागरिकांना त्रास होणार अशी  तात्पुरती दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावीत, अशी मागणी चिंचवडे यांनी केली आहे.

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget