May 2020

-लॉकडाऊनमध्ये गरजूंना औषधे, सुरक्षा किट, धान्य, भाजीपाला, भोजनाचे वितरण,

- पोलिसांना राहण्यासाठी हॉटेल व्यवस्था

-पहिल्या दिवसांपासून तुषार हिंगे प्रभागात ठाण मांडून 

पिंपरी, ( -  कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार वाढू नये म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. त्या काळात सर्वसामान्य, कष्टकरी, दिव्यांग, निराधार, गरजू लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून उपमहापौर तुषार हिंगे पहिल्या दिवसांपासून कार्यरत आहेत. शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी प्रभाग क्रमांक दहामधील गरजू नागरिकांना धान्य, भाजीपाला, भोजन तसेच, औषध वितरणासह औषध फवारणी, सॅनिटायझर टनेल उभारणी, तात्पुरता भाजीपाला विक्री केंद्र, मास्क व सॅनिटायझर वितरीत करण्यात  पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या सक्रिय पुढाकाराबद्दल  प्रभागातील नागरिक कौतुक करीत आहेत.

चिंचवड स्टेशन येथील पोलिस लाइन वसाहत येथील 100 कुटुंबांना 15 दिवसांचा भाजीपाला त्यांनी वितरीत केला. निगडी व पिंपरी पोलिस ठाण्यात सॅनिटायझर टनेल बसविण्यात आल्याने पोलिस अधिकारी व कर्मचारी स्वत:ला निर्जंतूक करून कामकाज करीत आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये स्वखर्चाने औषध फवारणी केली. उपमहापौर तुषार हिंगे व कार्यकर्त्यांनी स्वत: फवारणी केली. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडूनही औषध फवारणी करून घेतली.  
प्रभागातील 100 गरजू कुटुंबाना किराणा व अत्यावश्यक साहित्याचे किट देण्यात आले. ‘विटॉमीन सी’ या कॅल्शियम वाढीच्या होमिओपॅथी औषधाचे प्रभागातील तब्बल 7 हजार 500 कुटुंबांना मोफत वितरण करण्यात आले. प्रभागातील गरजू, कष्टकरी, दिव्यांग, ज्येष्ठ आणि निराधार असा एकूण 2 हजार लोकांना दररोज भोजन वितरण सुरू आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हा उपक्रम सुरू आहे. प्रभागातील 9 झोपडपट्यांतील अनेक रहिवाशांना रेशनकार्डवर धान्य मिळत नव्हते. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत होती. त्याबाबत तहसीलदार व अन्नधान्य वितरण विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन सर्वसामान्यांना रेशन दुकानातून योग्य प्रमाणात धान्य मिळवून दिले. तसेच, शाहूनगर व मोरवाडीत तात्पुरती भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. त्या ठिकाणी सॅनिटायझर टनेल उपलब्ध करून दिले.

कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी दत्तनर, विद्यानगर, शंकरनगर, लाल टोपीनगर या झोपडपट्टयात मंडप घालून मुख्य रस्ते सील करण्यात आले. उपमहापौर हिंगे यांनी स्वत:चे थरमॅक्स चौक, चिंचवड येथील पंजाब रसोई हॉटेल पोलिसांना विश्रांतीसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. त्याचा लाभ असंख्य पोलिस अधिकारी व कर्मचारी घेत आहेत.

आजारी असतानाही तुषार हिंगे हे प्रभागात पहिल्या दिवसांपासून फिरत आहेत. गरजू व सर्वसामान्य नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे सहाय करीत आहेत. तसेच, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेगवेगळ्या बैठकांना उपस्थित राहून संबंधित अधिकार्‍यांना मार्गदर्शन करीत आहेत. महापालिका प्रशासनाच्या सुचनांची प्रभागात तातडीने अंमलबजावणी करून घेत आहेत.

लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसांपासून प्रभागात कार्यरत असलेले तुषार हिंगे अद्यापही नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात आहेत. स्वत: उपमहापौर हिंगे आणि त्यांच्या आरंभ सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य व शेकडो कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.


अनिल  सुभाष राजीवडे

14 एप्रिल ला इंडिया ते एथोपिया, आफ्रिका असा प्रवास केला होता सगळे लोक सांगत होते जगावर कोरोनाचे मोठे संकट चालू असताना तू कशाला जातो भारत सोडून पण एवढंच काय तर आत्तापर्यंत मी बरेच देश फिरलो पण वडील (अप्पा) मला कधीच म्हटले नव्हते की, तू या देशात जाऊ नको  त्या देशात जाऊ नको पण आता येण्याच्या आधी फोन करून म्हटले अरे कशाला जातोस एवढा प्रोब्लेम चालू असताना साहेबांना सांग आत्ता जाऊ शकत नाही म्हणून पण काय करणार कंपनीचे काम आहे साहेबांचा आदेश  होते आणि आफ्रिकेमध्ये कोरोनाचे पेशंट पण नव्हते त्यामुळे रोहित(Electrical engineer)  आणि मी 14 तारखेला आलो..
कामाला सुरुवात केली आठ दिवस झाले सर्व व्यवस्थित चालू होते.
23 एप्रिल थोडा ताप आला होता थोड घशात खवखव करत होत मनात शंका सतवायला लागली की आपण कोरोणा चा बळी तर पडणार नाही ना?
रात्रभर विचार करत राहिलो काय करायचं भीतीने निम्मा तर खचलो होतो, विचार करत राहिलो उगाच आपण जगावर कोरोणाचे संकट असताना प्रवास केला रात्रभर झोपही लागली नाही, विचार केला आपल्याला खचून चालणार नाही सकाळी उठून ऑफीस ला निघालो पण ताप वाढत चालला होता आता काय करायचे मोठा प्रश्न पडला होता जर आपण म्हटलो ताप आला आहे तर सर्व लोक आपल्याकडे वेगळ्या नजरेने पाहणार शेवटी विचार केला आणि ऑफीस शेजारी आमच्या तील काही लोक राहत होते त्यांच्या रूमवर जाऊन झोपलो व माझे सहकारी रोहित आणि किरण ला सांगितले ऑफिसमध्ये सांगा अनिल ला ताप येत आहे म्हणून पण  ते सांगायच्या अगोदरच बातमी वाऱ्यासारखी पसरली अनिल ऑफिसला का आला नाही म्हणून तो पर्यंत सगळ्या ,(जवळजवळ 80)लोकांनी काम बंद केले सगळे कामगार विचार करत राहिले की आपण अनिल सोबत काम केले आहे आपली पण चाचणी करावी लागणार व लोकांनी काम बंद केले व जोपर्यंत नक्की काही कळत नाही तो पर्यंत आम्ही काम करणार नाही असे इथोपियन लोक बोलायला लागले, मग तर मला खूप भीती वाटत होती. काय करायचे मला समजत नव्हते त्यात आफ्रिकन देशामध्ये औषध उपचार व्यवस्थित भेटत नाही हे पण मला माहिती होत पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता विचार करत राहिलो शेवटी आपल्या नशिबात आहे ते होईल असा निश्चय मनाशी केला तोपर्यंत ऑफीस मधील लोकांनी एथोपियन हॉस्पिटल ला संपर्क करून माझी माहीत दिली व त्यांनी सांगितले थोड्या वेळात तपासणी करण्यासाठी डॉक्टर येतील म्हणून, आम्ही एकूण नऊ जण चिंता करत राहिलो व सर्व ठीक होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करत राहिलो. आम्ही राहत होतो त्या परिसरात सगळी शांतता पसरली सगळे आमच्या कडे वेगळ्या नजरेने पाहू लागले.
 आम्ही सगळे चिंतेत बाल्कनी मध्ये यायचे परत आतमध्ये जायचे आमच्या घराजवळ चार पाच गाड्या उभ्या होत्या सगळे डॉक्टरांची वाट पाहत होते. माझ्या मनात विचार येऊ लागले आपण हॉटेलमध्ये जाताना येताना सनिटाईझर वापरत होतो नाश्ता करताना पण कोणाच्या जवळ बसलो नाही, हॉटेल मध्ये एक चिनी दिसला होता तर  त्याच्या पासून आपण तर फिरकलो पण नाही मग आपला संपर्क आला कोठे ह्या विचारात मी पडलो, तोपर्यंत सगळ्यांचे लक्ष डॉक्टरांच्या गाडीकडे लागले होते तेवढ्यात एकजण आला म्हटला साहेब डॉक्टरांची गाडी आली तो पर्यंत डॉक्टरांची टीम चार ते पाच गाड्या आल्या होत्या.
मला वाटायला लागले की हे लोक आपल्याला घेऊन गव्हरर्मेंट हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणार, आमचे लक्ष डॉक्टरांच्या गाडीकडे लागले होते, डॉक्टर उतरले व त्यांनी कोरोणा सुरक्षा किट काढून परिधान केले व माझ्या दिशेने येऊ लागले मी त्यांना पाहिल्यावर (ड्रेस, मास्क) माझी अवस्था जिवंत असून मेल्यासारखी झाली होती तरीही मी सावरत त्यांच्या समोर गेलो ते जवळजवळ वीस फुटावरून माझ्याशी बोलू लागले व सर्व माहिती घेतल्यावर 14 दिवसासाठी आम्हाला नऊ जणांना कोरांटायीन केले. काय करावं समजत नव्हते ताप ,डोकं तर दुखत होते, तर मग मी सर्वांना सांगितले की मी एक रुममध्ये झोपतो तुम्ही वेगळ्या रूम मध्ये झोपा पण माझे सहकारी रोहित आणि किरण काही आयकायला तयार नव्हते ते तर म्हटले की जाउद्या काही घाबरु नका जे काय होईल ते सगळ्यांचे होईल त्यावेळेस मला जरा धीर आला पण तो त्यांचा आगाऊपणा होता असे मला वाटत होते कारण कोरोनाने सगळे जग अस्वस्त झाले आहे आणि हे सांगत आहे आपण एका रुममध्ये राहू शेवटी त्यांनी माझी गादी उचलून एका रुममध्ये टाकली सगळे झोपले पण मी रात्रभर विचार करत राहिलो झोप लागत नव्हती. चुकून आपल्याला जर कोरोनाची लागण झाली तर आपलं काही खरं नाही कारण येथे व्यवस्थित उपचार भेटणार नाही, आपली सगळी स्वप्न अधुरी राहणार आपल्याला काय झाले तर घरी कसे होणार, मुलांचे शिक्षण कसे होणार,घराचे हप्ते कोण भरणार असे सगळे प्रश्न डोळ्यासमोर येत होते.आणि येथे आपण सर्वाच्या बरोबर काम केले आहे म्हणजे त्यांना पण याचा संसर्ग होणार ही भीती सुध्धा मनात राहून राहून येत होती.
सकाळ झाली मी घरी फोन केला तर घरी काय सांगायचे सगळे प्रश्न डोळ्यासमोर उभे राहायचे, त्यामध्ये डॉक्टरांनी गोळ्या पण दिल्या नाही आपला आजार कसा बरा होणार याची चिंता वाटू लागली आणि भारतामधे लॉकडाऊन असल्यामुळे परत येण्यासाठी सुद्धा विमाने बंद होती त्यामुळे अजुन टेंशन येऊ लागले. सकाळी घरी फोन केला पण काय सांगायचे सुचत नव्हते,असे वाटत होते अप्पांच्या एकले असते तर बरे झाले असते, अश्रूंचा बांध फुटत होता, डोळ्यासमोर मरण पाहत होतो पण जर घरी माझी अशी परिस्थिती कळली तर घरचे काळजी करत राहतील त्यांना फक्त सांगितलं की आम्हाला सर्वांना कोरणटायिन केले आहे बाकी सगळे व्यवस्थित आहे.
सकाळी जेवण बनवण्यासाठी आमची कूक आली पण तिला कोणीतरी सांगितले की येथे कोणालातरी कोरोणा झाला आहे रात्री डॉक्टर आले होते तर ती क्षणाचाही विलंब न करता तिची बॅग घेऊन पळत सुटली.
मी सरांना ( M G Sir)फोन केला त्यांना परिस्थिती सांगितली त्यांनी मला धीर देत म्हणाले (Anil just maintain your confidence that all is well. Keep saying prayer and donot think about fever. Believe all will be well and that you are blessed with good health)  मी तेथील कंपनीत बोलून जेव्हा विमाने चालू होतील तेव्हा तुझी भारतात येण्यासाठी तिकीट करायला सांगतो, मी म्हटलो ठीक आहे दुसरा माझ्याकडे सुद्धा पर्याय नव्हता. मला कळत नव्हते काय करावं ते यांनी काही मेडीसिन पण नाही दिली तर बरं कसे होणार. येथील मॅनेजर शी बोललो कमीत कमी लोकल डॉक्टर ला तरी दाखवा म्हणजे ते काहीतरी मेडीसिन वगेरे देतील पण कोणताही डॉक्टर चेकिंग करण्यासाठी तयार नव्हता आणि जर शासकीय हॉस्पिटल मध्ये नेले तर अती भयानक होईल कारण तेथील परिस्थिती गंभीर आहे तेथे कोणाला आतमध्ये पण जाऊन देत नाही त्यामुळे ते लोक मला तिकडे पाठवायला घाबरत होते अशी परिस्थिती त्यांनी आमच्या ऑफिस मध्ये सांगितली आणि हे सर्व मला समजल्यावर  अजुन चिंता वाढली. मग आम्ही येताना भारतातून काही मेडीसिन (painkillers)आणलेल्या होत्या त्या घेत राहिलो. आणि व्हॉटसअप वर बरेच मेसेज यायचे की गरम पाण्यानी गुळणी केल्यावर कोरोनाचे विषाणू घशामध्येच मरतात, तर मी दररोज सकाळी आणि संध्यकाळी मिठ आणि गरण पाण्याच्या गुळण्या करत होतो. कोणीतरी मेसेज टाकला होता
गरम पाण्याची वाफ घेतली तर विषाणू मरतात, तर मी नाक भाजस पर्यंत गरम पाण्याची वाफ दिवसातून दोन वेळा घ्यायचो.
1दिवस झाला,2 दिवस झाला दररोज बातम्या पहायच्या पण सगळीकडे कोरोना, कोरोना, कोरोना शेवटी बातम्या पहायच्या बंद केल्या कारण दिवसेंदिवस पेशंट वाढत चालले होते.
शेवटी चार दिवसानंतर एक डॉक्टर तपासणी करण्यासाठी तयार झाला तो पण रात्री 8 वाजता तपासणी साठी आला चेक केल्यानंतर त्यांनी घाबरायचे काही कारण नाही म्हटला कोरोणा ची लक्षण दिसत नाही म्हटले पण आपल्याला 14 दिवस वाट पाहावी लागणार, कोरोणाची लक्षण नाही म्हटल्यावर थोडा जीवात जीव आला तो पर्यंत सर्वांना कळले होते की अनिल आफ्रिकेत आजारी पडला म्हणून सर्वांचे फोन चालू झाले पण त्यांना मी सगळे व्यवस्थित आहे असे सांगत होतो ज्यावेळी 14 दिवस झाले त्यादिवशी सुटकेचा निःश्वास सोडला व डॉक्टरांनी सर्वांना काम चालू करायला सांगितले व मी डॉक्टरांकडे चेकिंग साठी गेलो रक्त चेक केले तर डॉक्टरांनी   टायफर्ड असल्याचे सांगितले.
असो....एवढंच सांगतो तूच आहे तुझ्या व इतरांच्या जीवनाचा शिल्पकार.

नियम पाळा कोरोणा टाळा.

जीवनावश्यक काहीच नाही... जीवनच आवश्यक आहे......

-अनिल राजीवडे.
9637848855


            पुणे(टाईम न्युजलाईन नेटवर्क): कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केल्या. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, तथापि, खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, गिरीश बापट यांनी केंद्राकडून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
          बैठकीला उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, खाजगी हॉस्पिटलचे ८० टक्के बेड ताब्यात घेण्यात येणार आहेत. आपल्या सूचनांची प्रशासन निश्चित दखल घेईल. वेळोवेळी बैठका घेतल्या जातील. आपल्या सूचना वेळोवेळी पाठवा,असेही त्यांनी सांगितले.
         यावेळी खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, सोशल मिडिया अधिक सक्रिय केला पाहिजे. कोरोनाच्या  बाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना व प्रशासनाच्यावतीने सामान्य नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या सूचनांची रोजच्या रोज माहिती दिली
जावी. जेणेकरुन लोकप्रतिनिधींना माहिती मिळेल.
     खासदार सुप्रिया सुळे यांनी  परराज्यात रेल्वेने लोकांना पाठविले, प्रशासनाने  याबाबत उत्तम काम केले असल्याचे सांगितले.
       खासदार श्रीरंग बारणे यांनी वेळोवेळी प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अद्ययावत माहिती द्यावी,अशी अपेक्षा व्यक्त केली.  ग्रामीण रुग्णालये अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
    खासदार गिरीश बापट म्हणाले, परराज्यातील मजूर त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी अधिकाधिक रेल्वेची  व्यवस्था करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींना माहिती वेळोवेळी देण्यात यावी. पोलिस प्रशासनानेही समन्वय ठेवावा.पुणे कँटोन्मेंटला आणखी निधी द्यावा, असे ते म्हणाले.
   आमदार शरद रणपिसे यांनी कोरोनाबरोबर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. प्रभागनिहाय समिती नेमा. त्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना सामावून घ्या. नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पावासाळ्यापूर्वीची कामे त्वरित  करून घ्या, असेही त्यांनी सांगितले.
       आमदार सिध्दार्थ शिरोळे, लक्ष्मण जगताप, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, सुनील शेळके, महेश लांडगे, आण्णा बनसोडे आदींनी चर्चेत भाग घेऊन उपयुक्त सूचना केल्या.
            विभागीय आयुक्त डाॕ.दीपक म्हैसेकर यांनी कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न करण्यात येत आहे. सनदी अधिकाऱ्यांवरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.योग्य तो निधी जिल्ह्याला उपलब्ध करून दिला आहे.सर्व यंत्रणा समन्वयाने काम करीत आहे, असे सांगितले.
     जमाबंदी आयुक्त एस.चोकलिंगम यांनी ससून हॉस्पिटलबाबत माहिती देताना सांगितले, मृत्यू दर आता कमी झाला आहे. ससूनची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
   पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, मृत्यू दर कमी होत आहे.२१८२ लोक बरे होऊन घरी गेले आहेत. १० कोटीपेक्षा अधिक निधी विविध संस्थांनी वैद्यकीय उपकरणासाठी उपलब्ध करुन दिला आहे. वैद्यकीय तपासणीसाठी मोबाईल व्हॅन सुरू केली आहे. खासदार व आमदारांनी त्यांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.सॅम्पलींग वाढविले आहे. १६०० बेड तयार आहेत. बालेवाडीत ५०० बेडचे सेंटर कार्यान्वित केले आहे. काही हाॕस्पिटलबरोबर करार केले आहेत.
   जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, एप्रिल महिन्यात मृत्यू दर व रुग्णसंख्या अधिक होती.आता कमी होताना दिसत आहे.बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या जवळपास ५० टक्के आहे.भविष्यात परिस्थिती बिकट झाली तर त्यादृष्टीने उपाययोजना केल्या आहेत .पुण्याहून अन्य राज्यात व जिल्ह्यात कामगार, मजूर, विद्यार्थी , नागरिक यांना पाठविण्यात येत आहे. जनजागृतीचे उपक्रमही राबविण्यात येत आहे.
      पिंपरी-चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले,अजूनही परिस्थिती नियंत्रणात आहे. होम क्वारंटाईनवर अधिक लक्ष देत आहे.मोठ्या प्रमाणात टेस्टींग केले आहे. वर्दळीच्या ठिकाणच्या वसाहतीत रुग्ण सापडत आहे. शहर सध्या रेड झोनमध्ये नाही.उद्योगांना परवानगी दिली आहे.मोठ्या प्रमाणात जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहे.सोशल मिडियाचाही वापर करण्यात येत आहे. सध्या ४८ कंटेन्टमेंट झोन आहे.प्रत्येक वॉर्डासाठी पथक नियुक्त केले आहे.
    यावेळी पोलिस आयुक्त के.व्यंकटेशम् व संदिप बिष्णोई, साखर आयुक्त सौरभ राव, पुणे
मनपा अपर आयुक्त रुबल अग्रवाल व शांतनू गोयल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील आदी उपस्थित होते.पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
 
राज्य सरकारच्या वन महसूल आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन विभागातर्फे व मुख्य सचिव यांच्या आदेशान्वये 19 मे 2020 रोजी रिवाईज गाईडलाईन देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील उद्योगांना रेडझोन मधून बाहेर काढले असून नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे उद्योगांचे 33% टक्के मॅनपावरचा नियमही निघून जाईल. उद्योगनगरी येथील उद्योगांना गती देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील उद्योगांना रेडझोन मधून बाहेर काढल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आभार मानले आहे.
 
लॉकडाऊनमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच उद्योग गेल्या दोन महिन्यांपासून बंद होते. उद्योगनगरीत सर्व उद्योग पूर्ववत सुरू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वारंवार मागणी केली जात होती. त्यानंतर राज्य सरकारने ३३ टक्के उद्योगांना काही अटी व शर्तींवर कंपन्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतरही यामध्ये सुधारणा करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करण्यात आली होती. यावरती आज वन महसूल आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन विभागातर्फे व मुख्य सचिव यांच्या आदेशान्वये 19 मे 2020 रोजी रिवाईज गाईडलाईन देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील उद्योगांना रेडझोन मधून बाहेर काढले असून नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे उद्योगांचे 33% टक्के मॅनपावरचा नियमही निघून जाईल. आणि उद्योगनगरीचे उद्योगांची थांबलेली धडधड पुन्हा पूर्ववत होईल अशी आशा वाघेरे यांनी बोलताना व्यक्त केली.मुंबई, (टाईम न्युजलाईन नेटवर्क) :-  पुण्याचं सांस्कृतिक वैभव असलेला सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय पुण्यातील मानाच्या पाच आणि काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी संबंधित गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधी, सदस्यांचं अभिनंदन केलं असून जाहीर आभारही मानले आहेत. राज्यावरील कोरोनाचं संकट पाहता पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही या निर्णयाचं अनुकरण करतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
पुणे शहरानं नेहमीच सामाजिक चळवळींचं नेतृत्व केलं असून समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं आहे. पुण्यातील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरी वाडा या मानाच्या गणपती मंडळांनी, तसंच भाऊ रंगारी मंडळ, श्रीमंत दगडुशेठ गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ व अन्य गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आणि सार्वजनिक हिताच्यादृष्टीने महत्वाचा निर्णय आहे. विशेष म्हणजे हा निर्णय घेण्यासाठी झालेली बैठक देखील ‘ऑनलाईन’ झाली. सार्वजनिक उत्सव साधेपणानं साजरा करत असताना महापालिका व पोलिस यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करण्याचा घेतलेला निर्णयही कौतुकास्पद आहे. पुण्यातील सार्वजनिक मंडळांच्या प्रतिनिधींनी दाखवलेलं हे समाजभान कौतुकास्पद आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या अटी आणि शर्थींचं पालन करुन गणेशोत्सव साजरा करण्याचा हा निर्णय सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल. राज्यातील अन्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनाही यातून प्रेरणा, प्रोत्साहन मिळेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.


मुंबई (टाईम न्युजलाईन नेटवर्क): कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली  जातील यादृष्टीने कृषी विभागाने आखणी  करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले तर कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी आज येथे व्यक्त केला.
राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयातून उपमुख्यमंत्री अजीत पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनील देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, सामान्य प्रशासन विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. तर प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री त्या-त्या जिल्हाधिकाऱ्यांसह व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, धोक्यात आलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी  कृषी क्षेत्र महत्वाची  महत्वाची भूमिका बजावेल. कोरोनाचे संकट लक्षात घेता अन्न धान्याच्या दृष्टीने बाजारपेठेचा अंदाज घेऊन राज्यातील शेतकऱ्यांनी पावले उचलणे गरजे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी  राज्य, देशच नव्हे तर जगाची देखील भूक भागवावी, असे आवाहन करतानाच पिक कर्जाबाबत रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठपुरावा करीत असून राज्यातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही दिली.
खरीप हंगामासाठी पालकमंत्र्यांकडून चांगल्या सुचना आपल्याकडून आल्या. या सूचनांची दखल घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश कृषी व सहकार विभागाला दिले आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारला ६ महिने पूर्ण होत आहेत. मार्चमध्ये एक चांगला अर्थसंकल्प मांडला आणि कोरोनाचा वेढा आपल्याला पडला त्यामुळे आज राज्यासह देशाचीच अर्थव्यवस्था धोक्यात आली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


पुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क):
- देहू आळंदी पालखी सोहळयाचे नियोजन, स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील,योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे,संजय मोरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, वारकरी संप्रदायाची परंपरा असणा-या ऐतिहासिक अशा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार टाळेबंदीचे स्वरूप पाहता आळंदी ते पंढरपूर असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखीसोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
सोशल डिस्टसिंग’ बाबत शासनाची नियमावली, टाळेबंदीची परिस्थिती व येत्या काळातील संभाव्य चित्र, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळयाचे स्वरूप नेमके कसे असावे व त्याचे नियोजन कशा प्रकारे करावे या बाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल, शासनाने दिलेल्या सूचनांचे अत्यंत काटेकोर पालन करून आम्ही कमी संख्येत पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवणार असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांनी सांगितले.
देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे म्हणाले, आषाढी वारीची परंपरा अबाधित रहावी यासाठी तसेच या सोहळयासाठी गरजेच्या आवश्यक त्याच सुविधा शासनाकडून अपेक्षित आहेत, आम्ही समाजाची काळजी घेत तसेच शासनाचा नियमावलीचे पालन करून या पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
                   या बैठकीमध्ये पालखी सोहळयाचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग,प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी संख्या तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या
 प्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.


  पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
:  जिल्ह्याच्या व राज्याच्या विविध भागातून मजुरांचे पायी चालत जावून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाय करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले. 
या उपाययोजनांचा एक भाग म्हणून मुळशी तालुक्यातील पिरंगुट ग्रामपंचायत क्षेत्रात मिळेल ते काम करणा-या राजस्थान येथील मजुरांना जिल्हा प्रशासनाने राजस्थानला जाण्यासाठी बसचे नियोजन केले. प्रशासनाचे नियोजन, सोशल डिस्टंसिंगचे अत्यंत काटेकोर पालन करत वैद्यकीय तपासणी केलेल्या या 24 मजुरांना आज दुपारी बसने राजस्थानकडे रवाना करण्यात आले. यावेळी तहसिलदार अभय चव्हाण, मंडळ अधिकारी सुहास कांबळे, तलाठी पासलकर व पिरंगुट ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुळशी तालुक्यातील पिरंगुट ग्रामपंचायत क्षेत्रात मिळेल ते काम करुन आपली उपजीविका भागविण्यासाठी कार्यरत असलेले राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यातील 24 मजुरांना आज त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने मजुरांसाठी निवारागृहे उभारली आहेत. लॉकडाऊन कालावधीत अनेक मजुरांना निवारा गृहांचा आधार मिळत आहे. तिस-या टप्प्यातील लॉकडाऊनमधे काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने आपल्या हाताला इथे रोजगार मिळेल, त्यामुळे आपण इथे राहू शकता, अशी विनंती प्रशासनाने मजुरांना केली. मात्र, मजुरांनी आजपर्यंत केलेल्या व्यवस्थेबाबत प्रशासनाचे आभार मानत गावाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली. मजुरांच्या इच्छेवरून प्रशासनाने सर्व मजुरांची पिरंगुट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी व कागदपत्रांची पूर्तता करुन राजस्थान सरकारची परवानगी व जिल्हाधिकारी, पुणे यांची परवानगी घेत मजुरांसाठी बाडमेर जिल्ह्यातील आपल्या गावी जाण्यासाठी बसचे नियोजन केले. आज दुपारी ही बस मजुरांना घेवून राजस्थानकडे रवाना झाली.*विप्रो कडून  पुण्यात हिंजेवाडी येथे  विशेष कोविड रुग्णालयाची उभारणी*

*४५० खाटांच्या रुग्णालयासाठी महाराष्ट्र शासनासमवेत सामंजस्य करार*


मुंबई (टाईम न्युजलाईन नेटवर्क): जागतिक माहिती तंत्रज्ञान,  सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने पुणे येथे  ४५० खाटांचे  विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी यासंबंधीचा सामंजस्य करार नुकताच महाराष्ट्र शासनासमवेत केला आहे. हे विशेष कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजेवाडी येथे माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येईल.

महाराष्ट्र शासनाच्यावतीने पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि विप्रो लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा ग्लोबल हेड ऑपरेशन्सचे प्रमुख हरि प्रसाद हेडगे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

या प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले,  विप्रोच्या या मानवतावादी योगदानामुळे आपली वैद्यकीय पायाभूत सुविधा आणखी मजबूत होईल आणि साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांना याचा लाभ होईल

450 खाटांचे हे विशेष रुग्णालय महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सज्ज असेल. गंभीर रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात १२ खाटा उपलब्ध असतील. हे  कोविड १९ साठी समर्पित असे स्वतंत्र कॉम्प्लेक्स असेल. येथे नियुक्त केलेल्या डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या विशेष संकुलात २४ उत्तम खोल्यांची व्यवस्थाही असेल.

आवश्यक वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहाय्याने रुग्णालय त्वरित सुरु करण्यासाठी विप्रो, प्रशासकासह  संरचनेनुसार आवश्यक असणारा कर्मचारी  वर्ग नियुक्त करण्याबरोबरच भौतिक पायाभूत सुविधा, वैद्यकीय फर्निचर आणि उपकरणे प्रदान करेल.

या विषाणुविरुद्ध लढतांना सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे विप्रोचे अध्यक्ष रिशद प्रेमजी यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणतात की,  या विषाणुचा मानवी जीवनावरील परिणाम टाळण्यासाठी या आपत्तीच्या प्रसंगात देशाप्रतीच्या समर्पित भावनेला कटिबद्ध राहून विप्रोने सहकार्याचा हात पुढे केला आहे तसेच विप्रो शासनासमवेत एकत्र येऊन या लढ्यात सहभागी होत आहे, महाराष्ट्राच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

विप्रो लिमिटेड, विप्रो इंटरप्रायझेस लिमिटेड आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन ने कोविड १९ विरुद्ध लढतांना या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  आतापर्यंत ११२५ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.  कोरोना विषाणुचा  मानवी जीवनावर होणारा प्रभाव रोखण्यासाठी मदतीच्या रुपाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या संसाधनांचा नक्कीच उपयोग होईल व त्याद्वारे वैद्यकीय क्षेत्र सक्षम होण्यास देखील मदत मिळेल.

 सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणाऱ्या विप्रो आणि  अझीम प्रेमजी फाऊंडेशन ने  मुंबई,  पुणे,  औरंगाबाद वाळूज,  अमळनेर,  अहमदनगर,  अकोला, बीड, चंद्रपूर आणि गडचिरोली या  जिल्ह्यांसह देशभरात मदत कार्य केले असून शासनाच्या बरोबरीने कोविड १९ विषाणु विरुद्धच्या लढ्यात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत  देशातील 34 लाखाहून अधिक लाभार्थ्यांपर्यंत ही मदत पोहोचली आहे.
...    

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget