जीवन दान मिळाले, यापेक्षा दुसरा कोणता आनंद असू शकतो...- बरे झालेल्या कोरोनाबाधीत रुग्णांनी व्यक्त केल्या भावना*
*• तीन वर्षाच्या मुलापासून ते ९२ वर्षाची कोरोनाबाधित महिला बरी होऊन घरी गेली.*
*• सिंम्बायोसिस हॉस्पिटलमधून आज १५ रुग्णांना सुटी देण्यात आली.*
पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
          कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आम्ही भयभीत झालो होतो. जेव्हा आमची चाचणी करण्यात आली, तेव्हा अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले. आमचं कसं होणार, आयुष्याचं काही खरं नाही, अशी चिंता लागली होती, परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे आम्ही बरे झालो, अशी भावना पुणे स्टेशन परिसरातील एका कुटुंबाने व्यक्त केली.
या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य कृतज्ञतापूर्व भावना व्यक्त करताना म्हणतात, सुरुवातीला आमच्या वडिलांना न्यूमोनिया झाला. नंतर आम्ही त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले,  पण कोणी दाखल करुन घेतले नाही. अखेर पुणे महानगरपालिकेच्या नायडू इस्पितळात नेले, मात्र त्यांनी ससून रुग्णालयात पाठविले, त्यांना कोरोनाची लागण झाल्याने स्वतंत्र वार्डात ठेवण्यात आले. व्हेंटीलेटरवर ठेवून उपचार करण्यात आले. परंतु न्युमोनिया आजार असल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
पुन्हा आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. आमचे कुटुंब व नातेवाईक मिळून जवळपास २० जणांना कोरोनाची बाधा झाली. सर्व जण घाबरलो,  २० पैकी ८ जण आम्ही एकाच कुटुबांतील होतो. आम्हाला लवळे येथील सिम्बॉयोसिस रुग्णालयात उपचारार्थ आयसोलेशनसाठी ठेवण्यात आले होते. खरं तर फार चिंतेत होतो, अख्खं कुटुंब कोरोनाबाधित झालं. पण सुदैवाने आम्ही बरे झालो. या १५ दिवसात तणाव होता, परंतु डॉक्टर्स, नर्स आणि रुग्णालयातील सर्व सदस्य एवढ्या आपुलकीने वागत होते की, जणू काही आम्ही त्यांच्याच कुटुंबातील सदस्य आहोत.  खूप आपुलकीची भावना निर्माण झाली या निमित्ताने नागरिकांना आम्ही असे आवाहन करतो की, घाबरु नका, पण काळजी घ्या. शासन आपल्यासाठी खूप काही करीत आहे.  सर्दी, ताप, खोकला झाल्यास बिनधास्त दवाखान्यात जा, उपचार करुन घ्या. कोरोनाची लागण झाली तरी हिमतीने सामोरे जा... आपल्यासाठी सर्व यंत्रणा राबते आहे. आपल्याला फक्त हिंमत द्यायची असते.
सिंम्बायोसिस रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय नटराजन म्हणाले, आमच्या लवळे येथील सिंम्बायोसिस रुग्णालयात १५५ रुग्ण दाखल आहेत. आज बरे होऊन घरी गेलेले १५ रुग्ण ८ एप्रिल २०२० रोजी रुग्णालयात दाखल झाले होते. १४ दिवस उपचारार्थ ठेवण्यात आल्यानंतर जेव्हा त्यांचे सॅम्पल निगेटिव्ह आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसून येत होता. ९२ वर्षाच्या आजीबरोबर त्यांच्याच कुटुंबातील ३ वर्षांची मुलगी व एक पोलिओग्रस्त रुग्ण होता.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने सिंम्बायोसिस रुग्णालय व भारती रुग्णालयाबरोबर करार केला असल्याची माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. भविष्यात रुग्ण वाढले तर तयारी असावी या हेतूने आमचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

           

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget