मुंबई,(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : स्थलांतरीत रेशन कार्ड धारकांना धान्य मिळत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी, सूचना काही ठिकाणाहून प्राप्त होत आहेत. अडचणीच्या काळात या स्थलांतरीत कुटुंबाना त्यांचे देय रेशन उपलब्ध करून देण्यासाठी महसूल यंत्रणा काम करत असल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था (प्राधान्य कुटुंब व केशरी कार्डधारक) यांना शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणात व शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे स्थलांतरित ठिकाणी (रेशनकार्ड पोर्टेबिलिटी) धान्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिल्या आहेत. लॉकडाऊनच्या काळात जी किराणा दुकाने अथवा अत्यावश्यक सेवा केंद्रे उघडी ठेवली जात आहेत, तेथेही सर्वसामान्यांना वाढीव दराने माल विकला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करावी. महाराष्ट्रातील लॉकडाउन आता 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे,त्यामुळे आवश्यकता भासल्यास स्वतंत्र हेल्पलाईन निर्माण करावी, अशा सूचना मंत्री श्री. थोरात यांनी विभागाला दिल्या आहेत.
महसूल मंत्र्यांकडून अधिकारी- कर्मचाऱ्यांचे कौतुक
24 मार्च 2020 पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसूल व अन्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी अतिशय प्रभावीपणे, प्रामाणिकपणे रात्रंदिवस काम करीत आहेत, याचा सार्थ अभिमान आहे. अतिशय बिकट परिस्थिती आणि उपलब्ध संसाधनाच्या साहाय्याने आपण सर्वजण जे काम करीत आहात, ते निश्चितच अभिनंदनीय असल्याचे महसूल मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.