... तर शेतकऱ्यांप्रमाणे तमाशा कलावंतावर आत्महत्या करण्याची वेळ येईल


: तमाशावर अवलंबून असलेल्या कलावंतांनी पोट कसे भरायचे हा प्रश्न
: सरकारने विशेष अनुदान पॅकेज जाहीर करावे

 :राज्यात सुमारे २५० तमाशाचे फड

नारायणराव (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
गेल्या दोन वर्षांपासून तमाशा आणि लोकनाट्य सादर करणारी मंडळे अडचणीत येत असून करोनामुळे यात्रा, जत्रा रद्द झाल्याने होळी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंत आर्थिक घडी बळकट करण्याची आशाही आता कमी झाली आहे. त्यामुळे तमाशावर अवलंबून असलेल्या कलावंतांनी पोट कसे भरायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने विशेष अनुदान पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात खासदार अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनाही पत्र लिहिले आहे.
दसऱ्यापासून तमाशाच्या मोसमाला सुरुवात होते. मात्र यंदा आचारसंहितेमुळे यात अडचण निर्माण झाली. तमाशा कलावंतांना होळीपासून बुद्ध पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या जत्रा आणि यात्रांकडूनही अपेक्षा होती. होळीनंतर या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती, मात्र करोनामुळे अडचण निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी ओला दुष्काळ आणि सन २०१८ मध्ये कोरडा दुष्काळ, नोटबंदी यामुळे तमाशा कलावंतांवर विपरित परिणाम झाल्याचे महाराष्ट्र तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी सांगितले.
 त्यामुळे कलावंतांना आर्थिक पाठबळाची गरज आहे. प्रत्येक फडामध्ये १०० ते १५० कलावंत असतात. एका फडावर अनेकांचे जगणे अवलंबून असते. यासाठी उपाययोजना मिळाली नाही तर या कलावंतांवर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्येची पाळी येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीमध्ये तंबुतील फडांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचा अंदाज घेतला तर प्रत्येकाचे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.
अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे पदाधिकारी आणि तमाशा कलावंत मोहीत नारायणगावकर यांनीही करोनामुळे मोठे नुकसान होत असल्याची खंत व्यक्त केली. या मोसमाकडून अपेक्षा होत्या. राज्यात सुमारे २५० फड असून राज्यभरातील जत्रांमधून पुढच्या वर्षाची बेगमी करता येते. मात्र आता कलावंतांनी पैसे मागितले तर कुठून द्यायचे असा प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
सरकारने या कलेला तगवण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन शांताबाई जाधव संक्रापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या शांताबाई जाधव यांनी केले. त्या गेली सुमारे ४२ वर्षे तमाशाची कला सादर करत आहेत. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये सातत्याने संकटांना तोंड द्यावे लागल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. करोनाचे संकट लवकर संपेल आणि तमाशा उत्सव कार्यक्रमांवरील तसेच इतरही बंदी लवकर उठेल, अशी आशाही त्यांना आहे. मात्र सध्या झालेल्या नुकसानीची दखल सरकारने घ्यावी, अशी प्रातिनिधिक मागणी त्यांनी केली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget