राज्यात नव्याने आठ ठिकाणी स्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु करणार▪ राज्यात ७०० व्हेंटिलेटर, ६०० आयसोलेशन बेडस तयार
▪ केंद्र शासनाकडून १० लाख तपासणी किट्स मिळणार

पुणे, (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्यात नव्याने आठ  ठिकाणी स्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून तात्काळ तीन ठिकाणी लॅब सुरु होणार आहेत. मुंबई येथील केईएम व कस्तुरबा रुग्णालयात नव्याने आणखी एक लॅब, पुण्यात बी.जे मेडीकल कॉलेज या ठिकाणी नवी टेस्टिंग लॅब उद्यापासून सुरु होणार आहे. तर हाफकिनला आणखी दोन लॅब पुढील चार दिवसांत सुरु होतील. धुळे, औरंगाबाद आणि सोलापूरमध्येही लॅब सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरण मिळणार आहेत. केंद्र शासनाकडून १० लाख तपासणी किट्स मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.
          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे पुण्यात आले होते, त्यांनी राष्ट्रीय विषाणू संस्थेला भेट दिली.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका अतीरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील ,आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डाॕ.सुभाष साळुंके आदी उपस्थित होते.
         आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, राज्यात ७०० व्हेंटिलेटर, ६०० आयसोलेशन बेडस तयार आहेत. खासगी रुग्णालयांना आयसोलेशन बेड ठेवण बंधनकारक करण्यात आले आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात १०० आणि वायसीएम रुग्णालयात ६० आयसोलेटेड बेडसची व्यवस्था करण्यात आली आहे. नायडू रुग्णालयात आठ करोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, त्यांच्यासाठी मानसिक आधार देण्याची आवश्यकता असून क्वॉरंटाईन केलेल्या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देणार
असल्याचेही त्यांनी सांगितले.
        एनआयव्ही संस्थेला भेट दिल्याचे सांगून आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, एनआयव्ही संस्थेची लॅब  ५० ते ६० देशातील अन्य लॅबशी जोडलेली आहे. येथील संशोधकांशी कोरोना व्हायरसबाबात चर्चा केली. कोरोनाच्या चाचण्या घेण्यासाठी एक प्रोटोकॉल आहे. संबधितांची ट्रॅव्हल हिस्ट्री आणि कोरोनाची लक्षणे असतील तरच चाचणी केली जाते. सध्या राज्यात चार ठिकाणी चाचणी लॅब सुरु आहेत. केंद्र शासनाने दहा लाख किट्स ऑर्डर केल्या आहेत. उद्या आणखी तीन ठिकाणी लॅब सुरु होणार आहेत. तर पुढील चार दिवसांत आणखी पाच लॅब अशा एकूण आठ लॅब लवकच सुरू होणार आहे. खासगी लॅबलाही चाचणीची परवानगी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
         सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका, माहितीची अधिकृत स्त्रोतांकडून खात्री पटल्याशिवाय अपूर्ण, अर्धवट, खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरवू नका,असे प्रकार करणाऱ्या विरोधात पोलीस दलाचा सायबर पोलीस विभाग कार्यवाही करेल, असे सांगून आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ज्या व्यक्तींना त्यांचे अहवाल निगेटीव्हआल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.त्या व्यक्तींच्या हातावर 'होम क्वारंटाईन' असा शिक्का मारण्यात आला आहे. या व्यक्तींना १४ दिवस कोणाच्याही संपर्कात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनीही स्वतःच्या  आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री श्री टोपे यांनी केले आहे.
                                                     0000

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget