पुणे,(टाईम न्युजलाईन नेटवर्क): गोरगरिबांच्या मनात हे माझं सरकार आहे,अशी भावना निर्माण झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी शासन कटिबद्ध राहील, असा विश्वास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केला.
सनई-चौघड्यांचे मंजूळ स्वर, तुतारींच्या गगनभेदी गर्जना,ढोल-ताशांचा निनाद, भगव्या पताका, 'जय भवानी, जय शिवाजी', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय'चा जयघोष अशा आनंदमयी वातावरणात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव किल्ले शिवनेरीवर उत्साहात साजरा झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आमच्या प्रत्येकाच्या ह्रदयात शिवविचार आहे. जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे तेज, प्रेरणा आपल्या पाठिशी असणे आवश्यक आहे. शिवनेरी आपले वैभव आहे. या वैभवाचा वारसा जतन करण्यासाठी आणि हा वारसा पुढे नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व समाजाच्या विकासाची दिशा दाखवली. शिवनेरी परिसराचा विकास आर्थिक तरतुदीअभावी प्रलंबित राहता कामा नये, याची दक्षता राज्य शासन घेत आहे. शिवनेरी परिसरातील विकास कामांसाठी तातडीने 23 कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील.
मराठा आरक्षणाच्यावेळी दाखल झालेले गुन्हे कायद्याच्या चौकटीत राहून मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. ज्या गुन्ह्यात शासकीय मालमत्ता किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले नाही, ते गुन्हे नियमांच्या अधीन राहून मागे घेतले जातील, असेही श्री.पवार यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायिला. त्यानंतर पोलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बालशिवाजी व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.