पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क)
: देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज केले.
लोणावळा येथील भारतीय नौदलाच्या आयएनएस शिवाजी या प्रशिक्षण संस्थेला आज राष्ट्रपती श्री कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रपती ध्वज (प्रेसिडेंट कलर) प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रपतींच्या सुविद्यपत्नी सविता कोविंद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, नौसेना अध्यक्ष एडमिरल करमबीर सिंह उपस्थित होते.
राष्ट्रपती कोविंद म्हणाले, देशाची सागरी अर्थव्यवस्था लोकांच्या हिताशी जोडली जात आहे. बहुतांश व्यापार समुद्र मार्गाने केला जात आहे. केवळ राष्ट्रीय सुरक्षाच नव्हे तर देशाच्या आर्थिक सुरक्षेत आणि राष्ट्रनिर्मितीच्या विस्तृत प्रक्रियेत भारतीय नौदलाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. नौदल हे आपल्या समुद्री सामर्थ्याचे प्रमुख साधन आहे. समुद्री सीमांचे संरक्षण करण्यासाठी तसेच व्यापारी मार्ग सुरक्षित करण्यासाठी आणि नागरी आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यात नौदलाच्या धाडशी कार्याचा देशाला अभिमान आहे. भविष्यातही नौदलाच्या माध्यमातून निश्चितच गौरवास्पद कामगिरी घडेल, असा विश्वास श्री. कोविंद यांनी व्यक्ति केला.
यावेळी आयएनएस शिवाजी प्रशिक्षण संस्थेचे अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.