पिंपरी- (टाईम न्युजलाईन नेटवर्क) पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाच्या माजी अध्यक्षाने मनमानी, दादागिरीने कारभार केला.कामगारांच्या पैशांतून स्वत:ची पोळी भाजून घेतली. भूलथापा देऊन कर्मचा-यांना फसविले. कंत्राटे मिळविणे, ठेकेदारी करणे हा त्यांचा खरा धंदा आहे. प्रत्येक कामात स्वार्थ पाहिला. कर्मचा-यांना दुजाभावाची वागणूक दिली. कामगार भवन, पालखी, पेन्शन, धन्वंतरी योजना, पतसंस्था, दिवाळी फराळात देखील भ्रष्टाचार केला. आता कर्मचा-यांची सहनशक्ती संपली असून शनिवारी होणा-या निवडणुकीत कर्मचारी घोटाळेबाजांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास 'आपला महासंघाचे पॅनल' प्रमुख अंबर चिंचवडे यांनी व्यक्त केला.सर्व आरोपांचे आपल्याकडे पुरावे आहेत.न्यायालयात जाऊन यांचा मनमानी कारभार उघडकीस आणला. त्यांच्या मनमानी, दादागिरीच्या कारभाराला साथ न दिल्यामुळे आमच्यामुळे निवडणूक लादल्याचा आरोप केला जात आहे. अंबर चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली आपला महासंघ पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहे. याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पॅनलचे उमेदवार अभिमान भोसले, सुप्रिया सुरगुडे,योगेश रसाळ,बाळासाहेब कापसे,अविनाश ढमाले,धनाजी नखाते,गोरख भालेकर,शुभांगी चव्हाण,विलास नखाते,अमित जाधव,सुरेश गारगोटे,बाळू साठे,अनिल राऊत,धनेश्वर थोरवे,अविनाश तिकोणे,रणजीत भोसले,सुभाष लांडे,मिलिंद काटे,नवनाथ शिंदे,योगेश वंजारे उपस्थित होते. आमच्या पॅनलमधील सर्व उमेदवार उच्चशिक्षित असून यंदा महासंघात नक्की परिवर्तन होणार, काही ठराविक पदाधिका-यांच्या स्वार्थापोटी महासंघाला लागलेले ग्रहण सुटणार आहे. कामगारविरोधी ढोंगी, फसव्या, घोटाळेबाजांना त्यांची जागा कामगार दाखवून देईल. माजी अध्यक्षांनी केवळ कंत्राटे मिळविणे, ठेकेदारी करणे, जवळच्या लोकांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचे काम केले आहे. कर्मचारी बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांना सवलतीच्या दरात औषधे मिळावीत यासाठी कर्मचारी महासंघाच्या माध्यमातून महासंघ मेडिकल सुरु केले. या पदाधिका-यांनी यामध्ये देखील भ्रष्टाचार केला. कर्मचारी पतसंस्था म्हणजे महापालिका कर्मचाऱ्यांची आर्थिक अशा आणि आकांक्षा आहे. अशा या पतसंस्थेतही महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक घोटाळे केल्याचे कामगारांच्या निदर्शनास आले आहे. कर्मचा-यांच्या न्याय हक्कासाठी लढणे सोडून त्यांच्या जिवावर माजी अध्यक्षांनी ठेकेदारी करण्याचा धंदा सुरु केला आहे. पेन्शन योजना अंशदान कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे पोकळ आश्वासन देण्यात आले. एक वर्ष पूर्ण होत असतानाही त्या आश्वासनांची कुठलीही पूर्तता झालेली दिसत नाही. म्हणजेच केवळ कर्मचाऱ्यांना आश्वासनांचे गाजर दाखवण्यात पटाईत असलेले हे महासंघाचे माजी अध्यक्ष आहेत.दिवाळी फराळात देखील गोलमाल केला आहे. दरवषी पालखी सोहळ्यातील भाविकांना अन्नदान करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून वर्गणी जमा करण्यात येते. स्वेच्छने दिली जाणारी वर्गणी गेल्या काही वर्षांत दादागिरी आणि दहशतीच्या जोरावर जबरदस्तीने जमा करून त्यामध्येही लाखो रुपयांचा अपहार केल्याचे दिसून येते. थेरगाव सर्व्हे नंबर 9 येथे कर्मचारी महासंघाला महापालिकेकडून 60 गुंठे जागा कामगार भवन बांधण्यासाठी देण्यात आली. कर्मचारी महासंघाच्या पैशांतून याठिकाणी कामगार भवन बांधले जाणार असतानाही अध्यक्षांनी ही प्रक्रिया अतिशय गुप्तपणे केली. त्याचे बांधकाम 4 कोटी 80 लाख रुपयांमध्ये होऊ शकत असतानाही तेच तेच बांधकाम यांनी 10 कोटी 31 लाख रुपयांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. याची निविदाही काढली असून यामध्ये 5 कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्याचा यांचा डाव स्पष्ट होतो. कर्मचा-यांसाठी वरदायिनी ठरणारी धन्वंतरी योजना स्वयंघोषित अध्यक्षांच्या आणि काही पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थीपणामुळे अडचणीची ठरू लागली. अनेक कर्मचा-यांना योजनेअंतर्गत उपचार मिळाले नाहीत. अनेक रुग्णालयांमध्ये कर्मचारी रुग्णाला भेदभावाची वागणूक दिली जाते. या योजनेमध्ये स्वतः कर्मचारी बांधवांचे पैसे असूनही त्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. यासारखी दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही. कर्मचारी बांधवांच्या आयुष्याशी त्यांच्या शारीरिक आणि आर्थिक आरोग्याशी खेळणाऱ्या तथाकथित अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना आता कामगार त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.