पर्यावरण व पर्यटन खाते सक्षम व महत्वपूर्ण बनविणार,*पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे*

पुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क): पर्यावरण आणि पर्यटन हे विभाग लोकांशी निगडित असून लोकसहभागावर भर देऊन ही खाती अधिक सक्षम व महत्वपूर्ण बनविणार, असे प्रतिपादन पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केले.

   'पुणे कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टावूनशिप 2030' या विषयावर आयसीसी ट्रेड टॉवर येथे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली परिषद घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा पीआयसी चे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय केळकर, पीएमआरडीए चे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रमकुमार, प्रा. अमिताव मलिक यांच्यासह पर्यावरण विभागातील तज्ज्ञ मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते 'मेकिंग पुणे कार्बन न्यूट्रल बाय 2030' या धोरणपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे म्हणाले, प्रदूषणाचे प्रमाण वाढत असून पर्यावरण रक्षण ही काळाची गरज आहे. पुण्यात राबवण्यात येणारा 'कार्बन न्यूट्रल स्मार्ट सस्टेनेबल टाउनशिप' उपक्रम राज्य पातळीवर राबवणे गरजेचे आहे. नगर नियोजन करताना व्यापक आराखड्यावर भर देणे आवश्यक असून यात सक्षम सार्वजनिक व खाजगी वाहतूक व्यवस्था, ट्रॅफिक व्यवस्थापन व पार्किंग व्यवस्था यांचा सविस्तर विचार होणे आवश्यक आहे. याबरोबरच इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर भर द्यायला हवा. या वाहनांसाठी नवीकरणीय ऊर्जेचा वापर होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
घनकचरा व्यवस्थापन आवश्यक असून ओला व सुका कचरा वर्गीकरणावर भर द्यावा लागेल. यात जनजागृती आवश्यक असून प्रत्येकाने  पुढाकार घ्यायला हवा. पर्यावरण संरक्षणासाठी शहरी भागात स्थानिक प्रजातींची वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे.  नदी काठ, समुद्र किनारे अशा सार्वजनिक ठिकाणी लहान मुले स्वच्छता अभियान राबविताना दिसतात. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची वेळ लहानांवर येऊ नये,  यासाठी मोठ्यांनी  दक्षता घ्यायला हवी. मुंबईमध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी हॉटेल, गृहनिर्माण संस्था, दुकाने, कंपन्या या ठिकाणी जनजागृतीवर भर देण्यात आल्यामुळे  घनकचरा व्यवस्थापन व वर्गीकरण यात अल्पावधीतच सकारात्मक परिणाम दिसून आले. पुण्यातही असा प्रयोग राबवल्यास निश्चितच चांगले बदल घडतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. शहरीकरण होताना हवा, पाणी या निसर्गातील घटकांचे प्रदूषण करून त्यांना हानी पोहचवता कामा नये. भविष्यात ऑक्सिजन पुरवणारी ठिकाणे निर्माण करण्याची गरज पडू नये यासाठी पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे ते म्हणाले.

विक्रमकुमार म्हणाले, पीएमआरडीए च्या वतीने पुण्यातील डोंगरउताराची जमीन, शेतजमीनीच्या संरक्षणावर भर देण्यात येत आहे. त्याचबरोबर चाकण, हिंजवडी व वाघोली हा भाग मेट्रोने जोडण्यात येणार असून त्यामुळे ट्रॅफिक ची समस्या कमी होईल, असे ते म्हणाले.
यावेळी शास्त्रज्ञ व तज्ज्ञ मान्यवर यांनी सादरीकरणातून माहिती दिली.

Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget