पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उर्दू व हिंदी माध्यमाच्या शाळांवर अन्याय; आमदार लक्ष्मण जगतापांनी केली आयुक्तांची कानउघाडणीपिंपरी,  (टाईम न्युजलाईन नेटवर्क) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून उर्दू व हिंदी माध्यमाच्या प्राथमिक शाळांवर अन्याय होत असल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. उर्दू व हिंदी माध्यमांसाठी रोष्टरनिहाय शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीचे आदेश देण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी आयुक्त हर्डीकर यांना केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या संच मान्यतेनुसार मागील तीन वर्षापासून उर्दू माध्यमाच्या शाळेतील ३७ शिक्षकांची व ६ मुख्याध्यापकांची तसेच हिंदी माध्यमाच्या शाळेत १ मुख्याध्यापक आणि २१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभागाच्या प्रशासनाने गेल्या तीन वर्षांत रिक्त पदांचे रोष्टर पूर्ण केलेले नाही. त्यामुळे ही पदे भरली गेली नाहीत. त्यातून विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, उपलब्ध शिक्षकांवर ताण येत आहे.

त्याचप्रमाणे शालेय गुणवत्तेवर व विध्यार्थी पटसंख्येवर परिणाम होत आहे. या दोन्ही माध्यमांतील अनेक पदोन्नती पात्र शिक्षक, मुख्याध्यापकांनाही आपल्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले आहे. शासनाने शिक्षक भरतीसाठी सर्व माध्यम रोष्टर पूर्ण करून शिक्षकांची जाहिरात व शिक्षक भरती पोर्टलला जाहिरात देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तसेच रोष्टर पूर्ण करण्यासाठी शासनाने वारंवार मुदतवाढही दिली होती. तरीही महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन रोष्टर पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

आपली चूक झाकण्यासाठी रोष्टर पूर्ण होत नसल्याचे कारण देत उर्दू व हिंदी माध्यम शिक्षक भरतीला रिक्त पदे दाखवली जात नाहीत, तर दुसरीकडे मात्र रोष्टर नसतानाही प्राथमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेतले जात असल्याने उलटे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत संदिग्धता निर्माण झाली असून, पात्र शिक्षकांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणाची चौकशी करून प्राथमिक शिक्षण विभाग प्रशासनाकडून उर्दू व हिंदी माध्यमांची रोष्टर निहाय रिक्त पदे भरण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे आदेश तात्काळ द्यावेत, अशी सूचना आमदार जगताप यांनी केली आहे.”
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget