भोसरीतील दहशत आणि दादागिरी संपवायची, – डॉ. वैशाली घोडेकरपिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) – गेल्या पाच वर्षांत फक्त भोसरी मतदारसंघासोबतच पिंपरी-चिंचवड महापालिकेतही दादागिरी आणि दहशत प्रचंड वाढली आहे. त्याच्या बळावर अनेक चुकीची कामे सुरू आहेत. टक्केवारी आणि वाढीव खर्चाच्या नावाखाली कोट्यवधींची लूट सुरू आहे. मोशी कचरा डेपो येथील नियोजित वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प, चिखलीतील संतपीठ, पंतप्रधान आवास योजना, चऱ्होली भागातील रस्ते प्रकल्पांच्या मंजुरीत प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. संतपीठसारख्या महान कामांतही यांनी पैसे खाल्ले आहेत. मतदारसंघातील प्रत्येक प्रकल्पांमध्ये स्वतःची भागादारी करून कोट्यवधी रुपये लाटले आहेत. त्याच पैशांतून आज निवडणूक लढविली जात आहे. या पैशांतूनच सोशल मीडियावर लाखो रुपये खर्च करून नागरिकांच्या मनांवर विकासकामे केल्याचे बिंबवले जात आहे. अशा प्रवृ्त्ती पुन्हा निवडून आल्यास भोसरी मतदारसंघाचे काय होईल, याचा मतदारांनी विचार करावा. जागरूकपणे  अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर व विद्यमान नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर यांनी केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी मासुळकर कॉलनी आणि नेहरूनगर भागात पदयात्रा काढून प्रचार केला. त्यावेळी त्या बोलत होत्या. राष्ट्रवादीचे नगरसेवक समीर मासुळकर यांच्या निवासस्थानापासून पदयात्रेला सकाळी साडेनऊ वाजता सुरूवात करण्यात आली. पुढे रिलायन्स बिल्डिंग, आर सेक्टर, डब्ल्यू सेक्टर, वास्तु उद्योग कॉलनी, नवनिर्माण मंडळ, उद्यमनगर, अंतरिक्ष कॉलनी, स्वप्ननगरी, यशवंतनगर झोपडपट्टी त्यानंतर नेहरूनगर , नूर मोहल्ला, ७८६ चाळ, वसंतदादा पाटील शाळा परिसर, क्रांती चौक, दोस्ती बेकरी, आंबेडकरनगर, शांती विहार, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प परिसरात पदयात्रा काढून प्रचाराचा समारोप करण्यात आला.

लांडे यांच्या या पदयात्रेत चिमुकलेही सहभागी झाले होते. लांडे यांच्यासोबत सेल्फी काढून चिमुकल्यांनी पदयात्रेत उत्साह निर्माण केला. लांडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांचे जागोजागी महिलांनी फुलांची उधळण करत उत्स्फूर्त स्वागत केले. महिलांनी स्वयंस्फूर्तीने पदयात्रेत सहभागी होत विलास लांडे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. लांडे यांनीही दहा वर्षे आमदार असताना भोसरी विधानसभा मतदारसंघात विविध योजना, प्रकल्प राबवून मतदारसंघाचा कायापालट केल्याचे नागरिकांना सांगितले. विठ्ठलनगर झोपडपट्टीतील नागरिकांना चांगली घरे उपलब्ध व्हावीत यासाठी या भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यासाठी पाठपुरावा केल्याचेही त्यांनी नागरिकांना सांगितले. तसेच कपबशी चिन्हासमोरील बटन दाबून जनतेला मूर्खात काढणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन विलास लांडे यांनी नागरिकांना केले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर व विद्यमान नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या, “भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दहशत, दादागिरी आणि गुंडगिरीचा मुद्दा हा काही खोट प्रचार नाही. पाच वर्षांपूर्वी या मतदारसंघात दादागिरी आणि दहशत नव्हती. कारण त्यावेळी विलास लांडे हे आमदार होते. ते सर्वांना सोबत घेऊन विकासाचे राजकारण करायचे. मात्र मतदारसंघातील जनतेने पाच वर्षापूर्वी एक चुकीचा निर्णय घेतला आणि दादागिरीचा उदय झाला. ही दादागिरी केवळ मतदारसंघापुरती मर्यादित राहिलेली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेतही अधिकाऱ्यांना दमदाटी केली जाते. नियमात बसत नसलेली कामे दम देऊन करून घेतली जात आहेत. प्रत्येक प्रकल्पात कोट्यवधींची लूट झाली आहे. मतदारसंघातील प्रत्येक प्रकल्पात यांचीच भागीदारी आणि वरून टक्केवारी वेगळी घेतली जात आहे.

सत्ताधाऱ्यांनी भागीदारी आणि टक्केवारीतून अमाप माया गोळा केली आहे. त्याच्याच जोरावर आताची विधानसभा निवडणूक लढविली जात आहे. जनतेच्या लुटलेल्या पैशांतून सोशल मीडियावर लाखो रुपये खर्च करून विकासकामे केल्याचे नागरिकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रकार सुरू आहे. सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांत मतदारसंघात खरंच विकास केला असता, तर त्यांना फ्लेक्सबाजी, पेपरबाजी आणि सोशल मीडियाची गरजच भासली नसती. विकास केलेलाच नाही म्हणून तर सगळीकडे नुसती प्रसिद्धी सुरू आहे. नागरिकांनी आता जागरूक होऊन मतदारसंघातील या दादागिरीला आणि दहशतीला आणि विकासकामे केल्याचे खोटे सांगण्यासाठी सुरू असलेल्या भंपकबाजीला हद्दपार करण्याची हीच वेळ आहे. 

या पदयात्रेत माजी महापौर हनुमंत भोसले, राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, नगरसेविका गीता मंचरकर, मधुकर मासुळकर, अमित भोसले, राम मासुळकर, सतीश भोसले, ऋषीकेश भोसले, अमजद इनामदार आदी सहभागी झाले होते.


Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget