भोसरी मतदारसंघ विकत घेतल्यासारखे वागणाऱ्यांना जनता घरी बसविणार – सचिन चिखले


पिंपरी,  (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) – भोसरी मतदारसंघात सर्व पक्ष आपले मतभेद विसरून अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना विजयी करणार आहेत. लांडे यांना मतदारसंघातील जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कष्टकऱ्यांनी आणि गोरगरीबांनी ही निवडणूक आपल्या हाती घेतलेली आहे. सत्ताधाऱ्यांकडून भोसरी मतदारसंघ विकत घेतल्यासारखा कारभार सुरू आहे. लोकशाहीत लोक मालक असतात याचे भान त्यांना राहिलेले नाही. दहशतीच्या आणि पैशांच्या बळावर आपण कायम आमदार राहू असे काही जणांना वाटते. अशांना कायमचे घरी घालवण्याचे काम मतदारसंघातील जनतेने करावे, असे आवाहन मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले यांनी मंगळवारी (दि. १५) केले.
भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी मंगळवारी निगडीतील यमुनानगर, साईनाथनगर, निगडी गावठाण या भागात पदयात्रेद्वारे प्रचार केला. त्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच कष्टकरी महिलांनी मोठ्या संख्येने पदयात्रेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसह भाजप आणि शिवसेनेतील नाराजांनीही पदयात्रेत लांडे यांना पाठिंबा दिला. लांडे यांनी या सर्वांचे आभार मानले. तसेच या सर्वांच्यामुळेच आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला. चौकाचौकात महिलांनी लांडे यांचे औक्षण केले. लांडे यांनी नागरिकांशी संवाद साधून कपबशीला विजयी करण्याचे आवाहन केले.
निगडी गावठाणातील मारूती मंदिरात दर्शन घेऊन लांडे यांनी पदयात्रेला सुरूवात केली. लक्ष्मीनगर, दत्त मंदिर, सुवर्णयुग साईमंदिर, अमृता मठ, जेटीबी चौक, महादेव मंदिर, रत्ना हॉस्पिटल परिसर, शिवभुमी, श्रीनिवास हॉस्पिटल परिसर, इंदिरानगर, राजनगर, पवळे हायस्कूल, अंजुमन सोसायटी, आझाद चौक, पीसीएमसी वासहत नवी व जुनी बिल्डिंग, साईनाथनगर, यमुनानगर, दत्त मंदिर परिसरात ही पदयात्रा काढण्यात आली. त्यामध्ये स्थायी समितीच्या माजी सभापती सुमन पवळे, माजी नगरसेवक शशिकिरण गवळी, बीआरएसपीचे शहराध्यक्ष संजीवन कांबळे, बाळासाहेब वेदळेकर, राष्ट्रवादी महिला आघाडी शहराध्यक्षा व नगरसेविका वैशाली काळभोर यांच्यासह मनसे, राष्ट्रवादी आणि बीआरएसपीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले म्हणाले, “विलास लांडे हे भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. आताचे आमदार हे मतदारसंघाच्या भकासाचे शिल्पकार आहेत. त्यामुळे विलास लांडे यांना मतदारसंघातील सर्व समाज घटकांचा पाठिंबा मिळत आहे. त्यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. निगडीच्या संपूर्ण परिसराने लांडे यांच्या विजयाचा आधीच निर्धार केलेला आहे. मतदारसंघात गेल्या पाच वर्षात अक्षरशः हैदोस घालण्यात आला आहे. जनतेने विश्वास ठेवलेल्या कथित पैलवानाने गोरगरीब आणि मागासवर्गीय लोकांचा विश्वासघात केला आहे. पाच वर्षात मतदारसंघात एकही मोठा प्रकल्प उभारला गेला नाही. तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला नाही. उलट दुसऱ्यांनी केलेल्या कामांचेच हे श्रेय घेत फिरत आहेत. तेच सोशल मीडियावर दाखवून नागरिकांना फसवित आहेत. गतिमान सरकार आणि व्हिजन २०-२० म्हणून मतदारसंघातील जनतेला मूर्खात काढले गेले. व्हिजन नावावर आता पुन्हा आमदारकीला निवडून द्या म्हणत आहेत. कथित पैलवानाचे सर्व डावपेच जनतेने ओळखले आहे.
मतदारसंघात विकासकामांचा खोटा प्रचार सुरू आहे. कामे केली असती तर असे वागण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. विलास लांडे यांनी कामे केली पण कधी खोटे सांगितले नाही. मतदारसंघात जो काही विकास झाला तो विलास लांडे यांच्या माध्यमातून झाला. मात्र त्यांना कधी ऊर बडवून हे सांगण्याची गरज भासली नाही. मात्र आताचे सत्ताधारी न केलेल्या विकासकामांबाबत एवढा ऊर बडवत आहेत की जनतेला चीड येऊ लागली आहे. हा खोटपणा जनतेला आता सहन होत नाही. त्यामुळेच ही जनता आता चुकीच्या प्रवृत्तींना मतदारसंघात थारा देणार नाही. विलास लांडे यांच्या कपबशीला विजयी करून दमदार, रुबाबदार अशा काही विशेषणांसह लोकांना लुटणाऱ्यांना जनता मतदारसंघातून हद्दपार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget