पिंपरी:(टाईमन्युजलाईन नेटवर्क): चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप व भोसरीचे महेश लांडगे यांना शह देण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहे. महाआघाडीने चिंचवडमध्ये शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठींबा तर भोसरीत विलास लांडे यांना पुरस्कृत करून निवडणुक लढविण्याचा डाव आखला आहे. दोन्ही ठिकाणी कोथरुड पॅटर्न राबविला जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर पिंपरीमध्ये शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार, तर राष्ट्रवादीचे माजी आमदार आण्णा बनसोडे हे आमने-सामने ठाकले आहे.
राज्यात सर्वत्र महायुतीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मात्र चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा तसा विरळच म्हणावा लागेल. या मतदारसंघात विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. तर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
महायुतीच्या नेत्यांनी कलाटे यांना विविध अर्ज विनंत्या करूनही त्यांनी कार्यालयीन वेळ संपूनही माघार न घेता मैदानात ठाम राहण्याचा पवित्रा घेतला आहे.
त्यामुळे या मतदारसंघात खरी लढत महायुतीचे उमेदवार जगताप व शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यातच पहावयास मिळणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे राष्ट्रवादी कलाटे यांना पुरस्कृत करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरधरु लागली आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीचे महेश लांडगे आणि महाआघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्यात अटीतटीची निवडणूक होणार आहे. मात्र, या निवडणुकीत राजकीय शह काटशहाचे राजकारण सुरु होणार आहे. तिनही ठिकाणी चुरशीच्या लढत होऊ शकतात. नेहमी अपक्षांच्या पाठीशी उभा राहणारा हा मतदारसंघ या वेळेस कोणाला कौल देणार हे येत्या २१ तारखेला समजेल.
पिंपरीमध्ये शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार तर राष्ट्रवादीचे माजी आमदार आण्णा बनसोडे तसेच भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार बाळासाहेब ओव्हाळ आणि वंचित आघाडीचे बाळासाहेब गायकवाड यांच्यात चौरंगी लढत होणार आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.