भंगार चोर, करावर दरोडा टाकणारा, हफ्ते गोळा करणारा, मुरूम चोर, जागा बळकावणारा अशा शब्दांत चढविला विलास लांडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांवर राजकीय हल्ला


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क
) – भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार महेश लांडगे यांची कुंडली भोसरीतील सभेत जनतेसमोर मांडली. भंगार चोर असणारा हा आता नागरिकांच्या कराच्या पैशांवर दरोडा टाकत आहे. या भंगार चोर औरंगाबादेत पकडला गेला होता. रातोरात जाऊन मी त्याला सोडवून आणले. २००२ मध्ये आमदार झाल्यानंतर नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन मी त्याला नगरसेवकपदी निवडून आणले. आता त्याला पराभव दिसू लागला आहे. तो रडारडी करणार, बायकोला आणि पोरीला जनतेसमोर आणून रडायला लावणार, त्याची नाटक कंपनी आहे. त्यानेच ढोंग करावे, चोऱ्या पण त्यानेच कराव्यात. हफ्ते पण त्यानेच गोळा करावेत, अशा शेलक्या शब्दांत विलास लांडे यांनी महेश लांडगे यांच्यावर घणाघात केला.
भोसरीतील गावजत्रा मैदानावर झालेल्या प्रचार सभेत लांडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मोहिनी लांडे, डॉ. वैशाली घोडेकर, स्थायी समितीच्या माजी सभापती सुमन पवळे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक समीर मासुळकर, अजित गव्हाणे, राहुल भोसले, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, विक्रांत लांडे, नगरसेविका अनुराधा गोफणे, माजी नगरसेवक पंडित गवळी, मोहम्मद पानसरे, जालिंदर शिंदे, सतीश भोसले, गणपत आहेर, सतीश थिटे, संदिपान झोंबाडे, भरत लांडगे, ईश्वर ठोंबरे, दत्ता गव्हाणे यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत बोलताना विलास लांडे म्हणाले, “मी हवेली विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो. त्यावेळी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन महेश लांडगे यांना नगरसेवकपदी निडून आणले. त्यावेळी मला अजितदादा म्हणाले की हा जकात चोरतो, मारामाऱ्या करतो. नगरसवेक झाला तर महापालिका विकून खाईल. आज तेच झाले आहे. पण मी त्यावेळी माझे नाते जपले. याला औरंगाबादेत भंगार चोरीत पकडण्यात आले होते. मी रातोरात जाऊन याला सोडवून आणले. नाते महत्त्वाचे समजून हे मी सगळे केले. आता ते ज्या ऑफिसमध्ये बसतात, तेही माझेच आहे. मी त्याला नगरसेवक केले. त्याने आत्मचिंतन करावे.
या आमदारांचा व्यवसाय काय आहे. भंगार चोरण्याचा, जागा बळकावण्याचा यांचा व्यवसाय आहे. महापालिकेत नागरिकांनी भरलेल्या करांच्या पैशांवर दरोडा टाकणारा हा आमदार आहे. आता याने मतदारसंघातील मुरूम चोरून विकायचा नवीन धंदा सुरू केला आहे. मतदारसंघातील टपरीवाले, रिक्षावाले आणि बसचालकांकडून हफ्ते गोळा केले जातात. मागे-मागे फिरणाऱ्या हफ्ते गोळा करायला लावतो. तरुणांवर चांगले संस्कार करण्याऐवजी त्यांना वाम मार्गाला लावतो. तू चोऱ्या केल्यास तसे त्यांना शिकवू नको, असा सल्लाही त्यांनी दिला.
आता निवडणुकीत पराभव दिसू लागताच तो रडारडी करणार, बायकोला आणि पोरीला जनतेसमोर आणणार रडायचे नाटक करणार. त्याची नाटक कंपनी आहे. त्यानेच ढोंग करावे, चोऱ्या कराव्या तर त्यानेच कराव्यात, हफ्ते गोळा सुद्धा त्यानेच करावे. संपूर्ण मतदारसंघात दहशत पसरवून ठेवली आहे. पण जनतेने काळजी करण्याचे कारण नाही. कोणाच्या केसालाही धक्का लागला, तर विलास लांडे सोबत आहे. येत्या २१ तारखेला कपबशी चिन्हावर मतदान करून ही दहशत, हफ्तेगिरी, भंगारचोरी आणि दादागिरी मतदारसंघातून कायमची हद्दपार करा, असे आवाहन लांडे यांनी मतदारांना केले.”
यावेळी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने सभेत बोलताना म्हणाले, “मागील निवडणुकीत खोट्या आश्वासनाला बळी पडून दैवतासासमान विलास लांडे यांच्या विरोधात काम केले. त्या चुकीबद्दल मी विलास लांडे यांची माफी मागतो. आताच्या आमदाराला मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मदतीचा पवित्रा घेतला होता. त्याचा आज मला पश्चात्ताप होत आहे. प्रायश्चित करण्यासाठी व हिशोब चुकता करण्यासाठी निवडणुकीत विलास लांडे यांना निवडून आणणार आहे. आताचे आमदार स्थायी समिती सभापती असताना भोसरी उड्डाणपुलाजवळ शीतलबाग येथे ७० लाखाचे पादचारी पूल साडेसात कोटींना उभारण्यात आले. मोशीत वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात एका माजी पालकमंत्र्यांच्या नातेवाईकाची आणि या आमदाराची डील झाली आहे. त्यातून ५० कोटी रुपये लुटले जाणार आहेत. पंतप्रधान आवास योजनेची कामे तीनच ठेकेदारांना वाटून यांनी टक्केवारी खाल्ली आहे. ते तीन भाऊ आहेत. त्यातील एकजण कामाला जातो. दुसरा काय करतो ते तुम्हाला माहिती आहे. तिसरा आमदार आहे. यांचा काय धंदा आहे?, कुठून पैसे आणले यांनी?, यांच्याकडे दीड कोटींची गाडी आली कोठून? सामान्यांचे मुंडकु मुरडून हे सर्व आणले आहे.


अपक्ष उमेदवार विलास लांडे हे आमदार असताना त्यांच्या पत्नी मोहिनी लांडे महापौर होत्या. त्यावेळी लांडे यांनी महापालिकेत येऊन कधी कोणाकडे चिरीमिरी मागितल्याचे आम्ही ऐकले सुद्धा नव्हते. आजची परिस्थिती एक गेला की दुसरा आला, तो गेला की तिसरा आला तो गेल्यानंतर चौथा येतो आणि गोळा करून जातो, असा कारभार सुरू आहे. चऱ्होलीत अक्षरशः लूटमार सुरू आहे. तेथील शेतकऱ्यांना व बिल्डरांना लुटले जात आहे. विजेचे मीटर देतानाही कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला जात आहे. यांनी अक्षरशः कहर केला आहे. यांनी चूक केली आहे आणि नागरिक चुकीला माफी देणार नाहीत. अपक्ष उमदेवार माजी आमदार विलास लांडे यांनी कधी कोणाच्या मुंड्या मुरगळल्या नाहीत, हफ्ता मागितला नाही, भ्रष्टाचार केला नाही. मात्र आताच्या आमदाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या आमदाराची फडफड सुरू आहे. या निवडणुकीत गर्वाचे घर खाली नक्की होईल आणि अपक्ष उमेदवार विलास लांडे हे नक्की निवडून येणार, असा विश्वास दत्ता साने यांनी व्यक्त केला.”
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget