इंद्रायणीमाईचे विधीवत जलपूजन, भोसरीतील पुलाखाली अर्बन स्ट्रीटच्या कामाचे भूमिपूजन


पिंपरी, (टाईम न्युजलाईन नेटवर्क):
- पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणारे इंद्रायणी नदीचे पात्र आता स्वच्छ आणि प्रदूषणविरहित राहणार आहे. सांडपाणी इंद्रायणी नदीपात्रात जाऊ नये यासाठी महापालिकेमार्फत नदीच्या कडेने ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे.  इंद्रायणीमाईचे विधीवत जलपूजन करुन आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच भोसरीतील उड्डाणपुलाखालील सेवा रस्ते अर्बन स्ट्रीटनुसार विकसित करण्यात येणार आहे. या कामाचे देखील भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी महापौर राहुल जाधव, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षा यशोदा बोईनवाड, 'ई' क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष सुवर्णा बुर्दे, 'फ' क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्ष योगिता नागरगोजे, ज्येष्ठ नेते दत्तात्रय गायकवाड, बाळासाहेब गव्हाणे, बबनराव बोराटे, मधुकर बोराटे, माजी उपमहापौर शरद बोराडे, अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेश सस्ते, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गवळी, माजी नगरसेवक माउली जाधव, भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्व नगरसेवक-नगरसेविका तसेच अविरत श्रमदान संस्थेचे सर्व स्वयंसेवक, सायकल मित्र संस्थेचे स्वयंसेवक, महेशदादा स्पोर्ट्स फाऊंडेशन, इंद्रायणी जलपर्णी मुक्त अभियान, सीएचयू ग्रुप, गंधर्वनगरी वृक्षमित्र, चिखली मोशी हौंसिग सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.  

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदीपर्यंत इंद्रायणी नदीचा प्रवाह आहे. या भागात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे नदीचे प्रदूषण होत होते. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेऊन नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे निश्चय केला. त्याबाबत प्रशासनाला निर्देश देऊन प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करुन घेतला. नदीपात्राच्या कडेने ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे.  त्यामुळे रसायनमिश्रित, सांडपाणी नदीपात्रात जाणार नाही. त्यामुळे नदीचे पात्र स्वच्छ आणि सुंदर राहणार आहे.  

आमदार महेश लांडगे म्हणाले, ''अत्यंत सूक्ष्म अभ्यास करुन नदी सुधार प्रकल्पाचा अहवाल बनविला आहे. नदीपात्राच्या बाजूला ड्रेनेज लाईन टाकण्यात येणार आहे. त्यामुळे रसायनमिश्रीत आणि सांडपाणी नदीपात्रात जाणार नाही. त्यामुळे इंद्रायणीमाई मोकळा श्वास घेणार आहे. नदीचे पात्र स्वच्छ आणि सुंदर राहणार आहे. आषाढी एकादशी किंवा अन्य सण-उत्सवात इंद्रायणी पात्रात भाविकांना स्नान करण्यासाठी स्वच्छ पाणी राहणार आहे. "भोसरी व्‍हीजन-२०२०" मध्ये हाती घेतलेल्या सर्वांच महत्वाच्या इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पला सुरुवात झाली आहे''.  

महापौर राहुल जाधव म्हणाले, ''साबरमतीच्या धर्तीवर इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. इतिहासाच्या पानावर लिहिला जाईल असा नदीचा जलपूजन सोहळा झाला आहे. या प्रकल्पामुळे इंद्रायणी माई मोकळा श्वास घेणार आहे''.

 
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget