एक्स्प्रेस हायवे प्रवासासाठी सुरक्षित करण्याचा प्रयत्न, ७० ठिकाणी माहिती फलक लागले; आमदार जगताप यांची माहिती


पिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क) – पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरून अपघात विरहित आणि सुखकर प्रवास व्हावा यासाठी सरकारने काही नियम निश्चित केले आहेत. परंतु, नियमांकडे दुर्लक्ष करून वाहनचालक वाहने चालवत असल्याने एक्स्प्रेस हायवेवर अपघातांना निमंत्रण मिळत आहे. या गंभीर बाबींकडे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी वारंवार पत्रव्यवहार करून महामार्ग पोलिस आणि राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत एक्स्प्रेस हायवेवरून जाताना कोणत्या वाहनांनी कोणत्या लेनमधून गाडी चालवावी याबाबत माहिती देण्यासाठी महामार्ग पोलिसांनी मुंबईकडे जाणाऱ्या बाजूने ३७ ठिकाणी, तर पुण्याच्या बाजूने ३३ ठिकाणी फलक बसविले आहेत. तसेच या संपूर्ण महामार्गावर लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.
यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन शहरांचे अंतर कमी करण्याच्या उद्देशाने भाजप-शिवसेना युती सरकारने यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती (एक्स्प्रेस हायवे) मार्गाची निर्मिती केली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार पदरी असणाऱ्या या एक्स्प्रेस हायवेवरून सुखकर प्रवास व्हावा यासाठी वाहतुकीचे काही नियम निश्चित करण्यात आले. परंतु, प्रशस्त असलेल्या या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. कार, जीप, टेम्पो या प्रकारच्या हलक्या वाहनांनी एक्स्प्रेस हायवेच्या मध्य लेनमधून, जड व अवजड वाहनांनी सर्व्हिस लेनलगतच्या डावीकडील लेनमधून तसेच वाहनांना ओलांडताना उजवीकडील लेनचा अवलंब करणे नियमाने बंधनकारक आहे. त्यामुळे उजवीकडील लेन कायम रिकामी राहून वाहनांना ओव्हरटेक करणे सोपे जाईल, असा त्यामागचा हेतू आहे.
परंतु, वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी असलेल्या लेनमधून अवजड वाहने सर्रासपणे चालविली जातात. तसेच या लेनमधून प्रवास करताना वाहनाचा ताशी ८० किलोमीटर वेग असणे आवश्यक असताना त्यापेक्षा कमी गतीने वाहने चालविली जात असल्याचेही कायम निदर्शनास येते. परिणामी घाटामध्ये वाहतूककोंडी नित्याचीच झाली होती. तसेच अनेकदा अपघात होऊन कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करताना ही बाब कायम निदर्शनास येत होती. त्यामुळे एक्स्प्रेस हायवेच्या दोन्ही बाजूला ठिकठिकाणी वाहतूक नियमांची व चिन्हांची माहिती देणारे तसेच वाहतूक नियम मोडल्यास केली जाणारी कारवाई आणि कायदेशीर दंडाबाबत माहिती देणारे फलक लावण्यात यावेत, यासाठी राज्याचा गृह विभाग, महामार्ग सुरक्षा विभाग तसेच जिल्हाधिकारी यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार केला. २०१६ पासून हा पत्रव्यवहार सुरू होता. त्याचप्रमाणे विधानसभेच्या अनेक अधिवेशनातही हा मुद्दा आपण उपस्थित केला होता.
याबाबत राज्याच्या गृह विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मुंबईला जाणाऱ्या बाजून ३७ ठिकाणी, तर पुण्याच्या बाजूने ३३ ठिकाणी महामार्ग पोलिसांनी फलक बसविले आहेत. या फलकांवर कोणत्या वाहनांनी कोणत्या लेनमधून प्रवास करावा, याबाबतची स्पष्ट माहिती नमूद केली आहे. तसेच वाहतूक नियमांची माहिती देणारी चिन्हेही दर्शविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण एक्स्प्रेस हायवेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणीही आपण केली होती. त्याबाबतचा प्रस्ताव शासनाने विचाराधीन असल्याचे पत्र दिले आहे. याशिवाय एक्स्प्रेस हायवेवरून जाताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अवजड वाहनांच्या चालकांवर दंड करण्याबरोबरच त्यांचे टोलनाक्यावर प्रबोधन केले जात आहे. तसेच जानेवारी ते जुलै २०१९ अखेर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३ हजार ४३६ अवजड वाहनचालकांकडून २६ लाख ८७ हजार २०० रुपयांची दंडही वसूल करण्यात आल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे वाहनचालकांनी फलकांवर नमूद केलेल्या वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहने चालवावीत. त्यातून स्वतः सुरक्षित राहून इतर प्रवाशांनाही सुरक्षित ठेवावे, असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे.”
Labels:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget