मुंबई(टाईम न्युजलाईन नेटवर्क) : मुलूंड येथील कालीदास नाट्यमंदीर येथे अस्तित्वात असलेल्या ट्रस्टच्या धर्तीवर राज्यातील सर्व महानगरपालिका व नगरपालिकामधील नाट्यगृहांची दुरुस्ती व देखभालीसाठी ट्रस्टची स्थापना करावी. असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
महाराष्ट्रातील सिने कलावंत, नाट्य व लोककलावंत यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा याविषयासंदर्भात विधानभवनात बैठक पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी नाटयगृहातील सोयी सुविधा चांगल्या दर्जाच्या उपलब्ध करुन देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन नाटयगृहाची पाहणी करावी. सर्व नाटयगृहातील स्वच्छतागृहात पाण्याची सोय करणे,नाटयगृहातील खिडक्या, जाळया, दारे, फर्शी दुरुस्ती कचरापेटी उपलब्ध आहे की, नाही इत्यादी बाबींची पाहणी करुन याबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचे आदेश यावेळी डॉ.गोऱ्हे यांनी आज अधिकाऱ्यांना दिले. तसेच नाटयगृहात आपत्तकालीन स्थितीत अधिकाऱ्यांचा दुरध्वनी क्रमांक नाटयगृहात दर्शनी भागात लावावा. असेही डॉ.गोऱ्हे यांनी सूचित केले.
यावेळी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने कलाकारांसाठी शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती सादर केली.
यावेळी नाट्यकलावंत आदेश बांदेकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले,कार्यवाह सुशांत शेलार, महानगरपालिका औरंगाबाद चे सहायक आयुक्त पंकज पाटील, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त समिर उनाळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.