पिंपरी, (टाईमन्युजलाईन नेटवर्क):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराणेशाहीच्या माध्यमातून घरातील उमेदवार उभा करत आहे. हा माझा भारत देश म्हणजे पवारांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. हा सर्वसामान्य जनतेचा देश आहे. या देशातून सर्वसामान्यांचेच प्रतिनिधी जायला हवेत. घराणेशाहीला इथे थारा नाही, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
शिवसेना - भाजप - आरपीआय - रासप - शिवसंग्राम - रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 25) वाकड येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत ठाकरे बोलत होते. काळेवाडी फाटा येथे झालेल्या सभेला पुण्याचे विभागीय नेते, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेत्या आमदार डॉ. नीलम गो-हे, खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, आमदार बाळा भेगडे, संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राज्य संघटक गोविंद घोळवे, पीसीएनटीडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे, अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर, बारामती जिल्हा प्रमुख अॅड. राजेंद्र काळे, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, आरपीआय नेत्या चंद्रकांता सोनकांबळे, सल्लागार मधुकर बाबर, शहर प्रमुख योगेश बाबर, इरफान सय्यद, मावळ तालुका अध्यक्ष राजू खांडभोर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, शारदा सोनवणे, तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके आदी उपस्थित होते.
माजी खासदार गजानन बाबर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. पवना जलवाहिनीग्रस्त शेतक-यांनी श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, "महायुती होण्यापूर्वी आघाडीचे नेते लाकडी घोड्यावर बसून दिल्लीला निघाले होते. पण महायुती होताच त्यांचे लाकडी घोडे मोडून पडले. महाराष्ट्रात भगवं तुफान उसळलं आहे. ही भगवी मने महाआघाडीचा पराभव करणार आहेत. बारामतीची भानामती आता इथं चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जनतेने महापालिका, विधानसभेतून कधीच हद्दपार केले आहे. त्यामुळे आता महायुतीने ठरवले आहे 'पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार'; त्यामुळे विरोधकांनी सुद्धा आता घरीच बसायचं ठरवलं आहे.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.