उरण शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे उरण शहर आणि परिसरातील गावांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. सोमवारी सकाळी 8 वाजता जेएनपीटी टाऊनशिप गेटसमोर ही जलवाहिनी फुटली. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची जास्त गरज असताना ही पाईपलाईन फुटल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रात्रीपासून पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच उरणच्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला.
ही पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. उरण शहराला एमआयडीसीच्या मार्फत रानसई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यासाठी दोन फूट व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आली आहे. जेएनपीटी टाऊनशिप गेटसमोर ही पाईपलाईन सांध्यातून उखळल्याने लाखो लीटर पाणी वाया गेले. हे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पसरले होते. पाईप लाईन फुटल्याचे समजल्यानंतर लगेच पाणी पुरवठा बंद करण्यात आला आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. दुपारपर्यंत हे दुरुस्तीचे काम सुरू होते. सोमवारी संध्याकाळपर्यंत ही पाईपलाईन दुरुस्त होईल, असे एमआयडीसीचे उपअभियंता आर.डी बिरंजे यांनी सांगितले. या गळतीमुळे उरण शहरातील 30 हजार लोकांना आणि परिसरातील 25 गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.