Latest Post

 


नंदूरबार (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल्स खोल दरीत कोसळल्याने घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या अपघातामधील मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील वर्तवली जात आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या भीषण अपघातमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने संघटनेचा विस्तार करण्यासाठी अनेक नियुक्त्या केल्या आहे.भाजपच्या शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी किसन बावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.या नियुक्तीमुळे चिखली तळवडे परिसरात भाजपची ताकद वाढणार आहे.
भाजपचे शहर अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील संघटन मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहे. महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी संघटनेची रचना केली आहे.शहर जिल्हा उपाध्यक्ष पदी चिखलीचे भाजपचे कार्यकर्ते किसन बावकर यांची नियुक्ती केली.यामुळे चिखली तळवडे परिसरात भाजपची ताकद वाढणार आहे.बावकर हे पिंपरी चिंचवड माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष आहेत.
या संदर्भात किसन बावकर म्हणाले की,भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्णपणे पार पडणार आहे.शहारत भाजपचे संघटन मजबुत करून शहर भाजपामय करण्याचा प्रयत्न करणार आहे.तसेच शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्येवर आवाज उठविणार असून त्या कशा पद्धतीने सोडविण्यात येईल त्या संदर्भात प्रयन्त करणार आहे.असे त्यांनी सांगितले.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते "पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार"

अभियानाचा शुभारंभ

  • पुणे, (टाईम न्यूजलाईन नेटवर्क):


कोरोना विरुध्दच्या लढाईत  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वाची  ठरत आहे. पुण्यातील प्रत्येक नागरिकाला कोरोनामुक्त करण्यासाठी "पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार" अभियान सुरू करण्यात आले आहे. कोरोनामुक्त पुणे करण्यासाठी प्रत्येकाची साथ महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज केले. "पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार" अभियानाला सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोरोना (कोविड-१९) विरोधात जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" मोहिमेंतर्गत पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ व सामाजिक कार्य गट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या "पुण्याचा निर्धार - कोरोना हद्दपार" या अभियानाचा शुभारंभ झाला.  यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, उपमहापौर सरस्वती शेंडगे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी  डॉ राजेश देशमुख, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवडचे मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर,  पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादितचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप उपस्थित होते.

    उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यात सर्वत्र ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कुटुंबांची या आरोग्य पथकाकडून प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठीच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ मिळणेही तेवढेच आवश्यक आहे.  त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठीच्या प्रयत्नांना साथ द्यावी. मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, हातांची नियमित स्वच्छता आदी  दक्षता नियमांचे पालन करत आपल्याला कोरोनाशी मुकाबला करून अर्थव्यवस्था पुढे घेवून जावी लागणार असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

           पुणे शहरातील कोरोना रुग्णसंख्या घटत आहे, ही समाधानकारक बाब असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आपल्याला अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे. आपण यापूर्वीही घरी राहून, दक्षता घेत सण उत्सव साजरे केले आहेत. यापुढेही नियमांचे पालन करून सण उत्सव घरीच साजरे  करूया, तसेच कोरोनामुक्त पुणे शहर करण्याचा निर्धार करुया, असे सांगून राज्य शासन सर्वतोपरी पुणेकरांसोबत आहे, कोरोना उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोना मुक्तीसाठी सर्व यंत्रणा उपाययोजना करत आहेत, पुणे शहरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. यापुढेही काळजी घेत कोरोनाला हरवूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविक करताना डॉ. सुभाष साळुंके म्हणाले,  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत "पुण्याचा निर्धार- कोरोना हद्दपार" अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे सांगतानाचा कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही, त्यामुळे यापुढील कालावधीतही प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी "पुण्याचा निर्धार- कोरोना हद्दपार" अभियानांतर्गत सर्व उपस्थितांना शपथ देण्यात आली. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळ अंतर्गत बसचे चालक, वाहक यांना फेसशिल्ड, मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिक,पीएमपीएमएलचे कर्मचारी उपस्थित होते. आभार पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ राजेंद्र जगताप यांनी मानले.

शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांचे सहा ठिकाणी आंदोलन - कीर्तन, टाळ- मृदंगाच्या गजरात राज्य सरकारचे लक्ष वेधले पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दारु दुकाने, बार सुरू केले. मात्र, नागरिकांची श्रद्धास्थान असलेली मंदिरं अद्याप बंद ठेवली आहेत. मंदिरं बंद अन् उघडले बार…उद्धवा धुंद तुझे सरकार…अशी टीका भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिर बंद ठेवली आहेत. या निर्णयाविरोधात आणि आमची श्रद्धास्थाने असलेली मंदिरं ताबडतोब उघडावीत. या मागणीकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धर्माचार्य, साधु-संत, सर्व धार्मिक संस्था-संघटना एकत्र येत अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या नेतृत्वात मंगळवारी राज्यव्यापी लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे. कुदळवाडी येथील श्री दुर्गामाता मंदिरात पिंपरी-चिंचवडमधील उपोषणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताआबा गायकवाड, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेविका निर्मला गायकवाड, सुवर्णा बुर्डे, सचिन तापकीर, गीता महेंद्र, उदय गाकवाड, सुनील लांडे, प्रवीण काळजे, सरचिटणीस विजय फुगे, नगरसेविका प्रियांका बारसे, राजश्री जायभय, सरिता शर्मा, प्रसिद्धीप्रमुख पटनी आदी उपस्थित होते. तसेच, चिंचवड गाव येथे श्रीमान मोरया गोसावी मंदिराच्या आवारतही आंदोलन करण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील सहा मंदिरांच्या आवारात दिवसभरात आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला शहराध्यक्ष उज्ज्वला गावडे, सरचिटणीस अमोल थोरात, विजय फुगे, नगरसेवक स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार महेश लांडगे म्हणाले की, संपूर्ण जगाला भक्तीचा आदर्श देणारा आपला पालखी सोहळा राज्य सरकारच्या सूचनेनुसार रद्द केला. प्रशासनाच्या आणि सरकारच्या निर्णयाचा प्रत्येक नागरिकाने आदर ठेवला. लॉकडाउन संपल्यानंतर पहिला निर्णय राज्य सरकारने घेतला तो दारुची दुकाने चालू केली. हॉटेल चालू झाले. बिअर बार चालू झाले. मात्र, मंदिरं उघडली, तर कोरोनाचा संसर्ग वाढेल, असा शोध राज्य सरकारने लावला आहे. त्याला भाजपाचा विरोध आहे. नवरात्रोत्सवापूर्वी राज्यातील मंदिरं खुली करावी. या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. …तर भाजपाच्या रणरागिणी मंदिरांची कुलपं तोडतील : महापौर महाविकास आघाडी सरकारने नागरिकांची श्रद्धास्थान असलेली मंदिरं बंद ठेवली आहे. आता नवरात्रोत्सव येत आहे. याकाळात महिला- भगिनींची व्रत असतात. पूजा करायची असते. मात्र, मंदिरंच बंद असल्यामुळे महिलांना नवरात्रोत्सव साजरा करता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू करण्यात आले आहेत. मग, मंदिरं बंद का ठेवली जात आहेत? असा सवाल उपस्थित करीत महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सरकारवर टीका केली. तसेच, मंदिरं उघडली नाहीत, तर भाजपाचा रणरागिनी मंदिरांची कुलपं तोडून प्रवेश करतील, असा इशाराही दिला आहे.

देहूरोड (टाईम न्यूजलाईन नेटवर्क) : सतत होत असलेल्या वादातून प्रियकराने प्रेयसीचे अपहरण केले देहूरोडजवळील किवळे येथे घेऊन जाऊन तिचा गळा दाबून, दगडाने ठेचून प्रेयसीची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह खाणीत टाकला. पोलिसांनी प्रशांत गायकवाड (वय 31, किवळे) विक्रम रोकडे (वय 33, रा. रहाटणी) याना अटक केली असून त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. प्रिया शिलामन चव्हाण (वय 20, रा. आदर्शनगर, किवळे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. तरीही त्याने प्रिया यांच्याशी मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध ठेवले त्यांना सहा महिन्यांची मुलगीही आहे. दरम्यान, प्रिया या देहूरोडला आदर्शनगरला माहेरी राहायच्या. मुलगी झाल्यानंतर प्रशांतने या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात सतत वाद होत. प्रिया वारंवार प्रशांतच्या किवळेतील घरी जाऊन वाद घालायची दरम्यान, शनिवारी (ता.25) पहाटे दोनच्या सुमारास प्रशांत हा प्रिया यांच्या माहेरी गेला. तेथे भांडण करीत जबरदस्तीने तेथून प्रिया यांना घेऊन गेला. प्रिया सकाळपर्यंत घरी न आल्याने त्यांच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून देहूरोड पोलिसांनी प्रशांत याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. प्रशांत हा पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अशोक जगताप यांना मिळताच त्याला रहाटणी भागातून रविवारी (ता.27) पहाटे ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 1 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर करीत आहेत

भोसरी व्हीजन : २०२० : मोशीतील सफारी पार्कच्या कामाला राज्य सरकारचा हिरवा कंदिल! – पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून होणार विकास – आमदार महेश लांडगे यांच्या ‘व्हीजन-2020’मधील प्रकल्पाला गती पिंपरी (टाईम न्यूजलाईन नेटवर्क): पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्राच्या कामाला महाविकास आघाडी सरकारने आता हिरवा कंदिल दाखवला आहे. पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाचा विकास होणार आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी ‘भोसरी व्हीजन- २०२०’हे अभियान हाती घेतले होते. त्या अभियानाअंतर्गत मोशी येथे डीअर सफारी पार्क आणि मनोरंजन केंद्र उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता. शहरातील पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जातो. तत्कालीन पर्यटनमंत्री जय कुमार रावल यांच्यासोबत २०१९मध्ये बैठक घेण्यात आली होती. मात्र, त्यानंतर निवडणूक आचारसंहिता सुरू झाली. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने सरकार स्थापन केले. भारतीय जनता पार्टीला विरोधी बाकावर बसावे लागले. त्यानंतर कोविड-१९ ची परिस्थिती निर्माण झाली. परिणामी, हा प्रकल्प रखडणार, अशी चिन्हे निर्माण झाली होती. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील भाजपा आमदारांनी हाती घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकारने सकारात्मक दृष्टीकोनातून गती देण्याची भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विकास आराखड्यातील मोशीतील सफारी पार्क व मनोरंजन केंद्र या आरक्षणाचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विकास करण्याचे राज्य सरकारचे नियोजन आहे. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (मंगळवारी) मुंबईत बैठक घेवून कामाचा आढावा घेतला. यामुळे सफारी पार्क, मनोरंजन केंद्राच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.मंत्रालयात झालेल्या बैठकीला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वलसा नायर , महाव्यवस्थापक आशुतोष सलील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget