भ्रष्टाचारी पदाधिकारी व अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : सचिन साठे


पिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संत तुकारामनगर पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या दुरुस्तीत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. तसेच प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहाचे बांधकाम पूर्ण झालेले असतानाही कोट्यावधी रुपयांच्या वाढीव खर्चास मान्यता देणा-या महापालिकेतील भ्रष्टाचारी पदाधिकारी व अधिका-यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी,  काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.
पिंपरी चिंचवड असंघटीत कामगार काँग्रेसच्या वतीने गुरुवारी  पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात  महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या वेळी सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे,
महिला अध्यक्षा शीतल कोतवाल, उपाध्यक्ष नितीन पटेकर, ड्रायव्हर काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष नवनाथ डेंगळे, रमजान आत्तार, तारीक सय्यद, पिंपरी उपाध्यक्षा संजणा कांबळे, सचिव वंदना आराख, राजश्री वेताळे, तिफन्ना काळे, तोफा पवार, जया आराख, रोशन शेख, अनिता रूपटक्के आदींसह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी असंघटीत कामगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पीपीपी तत्वावरील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ऐश्वर्यम बांधकाम व्यावसायिकाबरोबर घरकूल प्रकल्प जाहिर करण्यात आला आहे. या बांधकाम व्यावसायिकाबाबत व प्रकल्पाबाबत कोणतीही शाश्वती नाही. यापूर्वी पालिकेने चिंचवड लिंक रोड येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत शेकडो घरे बांधली आहेत. परंतु प्रकल्पाची जागा ही आरक्षित असल्याचे नंतर कारण देत नागरिकांना ही घरे अद्यापही देण्यात आलेली नाहीत. यावरून असे निदर्शनास येते की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत वरील विषयांबाबत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार पदाधिकारी व अधिका-यांनी संगनमताने केला आहे. हे काँग्रेसने वेळोवेळी नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

Labels:

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget