युवकावर अ‍ॅसिड हल्ला:हल्लेखोराने केला पोलिसांवर गोळीबार :नंतर केली आत्महत्या


पुणे(टाईमन्युजलाईन नेटवर्क):
पुण्यात टिळक रस्त्यावर मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबलेल्या एका युवकावर एका तरुणाने अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. पोलीस या हल्लेखोरास पकडण्यासाठी गेले असता तो हल्लेखोर तरुण नवी पेठेतील एका इमारतीमध्ये लपून बसला. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही हल्लेखोराने गोळीबार केला. त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून या तरुणाने आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर त्या तरुणाचा मृतदेह इमारतीच्या ‘डक्ट’मध्ये पडला. पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्री उशिरा त्याचा मृतदेह बाहेर काढला. अ‍ॅसिड हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली नाही.
रोहित थोरात (वय 25 रा. स्वप्नगंधा अपार्टमेंट, टिळक रस्ता ) असे या अ‍ॅसिड हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या युवकाचे नाव असून सिद्धराम विजय कलशेट्टी (वय 25 रा. अक्कलकोट ) असे आत्महत्या केलेल्या हल्लेखोरांचे नाव आहे.
टिळक रस्त्यावर बादशाही हॉटेलजवळ मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास रोहित त्याच्या मैत्रिणीबरोबर गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी मागून चालत आलेल्या सिद्धराम कलशेट्टी याने रोहितच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकले. रोहितवर हल्ला करून कलशेट्टी हा नवी पेठेतील आनंदी निवास या इमारतीच्या गच्चीवर पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत कलशेट्टी याला पकडण्याचा प्रयत्न केला. ते पाहताच कलशेट्टी याने पोलिसांच्या दिशेने पिस्तुलातून दोन वेळा गोळीबार केला. अखेर स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्याचवेळी तो इमारतीच्या ‘डक्ट’मध्ये पडला.
पोलिसांनी त्वरित अग्निशामक कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. एक तासाच्या प्रयत्नानंतर हल्लेखोर कलशेट्टी याचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले. तब्बल पावणेतीन तास हे थरारनाट्य चालू होते. या घटनेमुळे परिसरामध्ये घबराट पसरली होती.
Labels:

Post a Comment

[blogger]

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget